कोपर्डे येथून मेंढपाळाचे सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले
सातारा | कोपर्डे येथील मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील दोन चुलत भाऊ बकरी चारायला गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने अंदाजे एक लाख 28 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रात्री उघडीस आली. या घटनेची फिर्याद दादा अंकुश ठोंबरे (वय- 40) यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले अशी, मेंढपाळ व्यावसायिक दादा अंकुश ठोंबरे व नवनाथ संपत टोंबरे हे दोन चुलत भाऊ दर वर्षी बकरी चारण्यासाठी गावोगावी फिरत असतात. या वेळी ते तोंडल (ता. खंडाळा) येथे चार दिवस मुक्कामी असून, येथील मखमल खोरी या शिवारात त्यांनी एका शेतकऱ्यांच्या कुटुंबात बकऱ्या बसवून सोन्याचे दागिने एका कापडी पिशवीत झाकून त्यावर प्लॅस्टिकचे कागद झाकून ठेवला होता.
मात्र, संध्याकाळी आल्यानंतर त्यांना अज्ञात चोरट्याने सोने-चांदी असणारी पिशवी लंपास केल्याचे आढळून आले. यामध्ये दादा अंकुश ठोंबरे यांच्याकडील 20 हजार किमतीचे अर्ध्या तोळ्याचे सोन्याची डोरली, तर 40 हजार रूपाचे एक तोळ्याचे कानातील फुले, तर आठ हजार 600 रुपये किमतीचे चांदीचे दागिने, तसेच चुलत भाऊ नवनाथ संपत टोंबरे यांच्याकडील 40 हजार किंमत असलेले एक तोळ्याचे सोन्याचा दागिना, 20 हजार रुपयाचे अर्ध्या तोळ्याचे कानातील सोन्याचे झुबे असे दोन्ही मिळून एकूण एक लाख 28 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. या घटनेचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.