पुणे- बेंगलोर महामार्गावर कराडजवळ ट्रकच्या धडकेत एकजण ठार
कराड | पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीत श्रीराम पॅलेस मंगल कार्यालयासमोर ट्रक क्रमांक (PB-13-BF-7563) धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रोहिनाथ शिवाप्पा गौडा (वय- 40 रा. कारला, जिल्हा- मेंगलोर- कर्नाटक) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीत कोल्हापूर ते सातारा जाणार्या लेनवर श्रीराम मंगल कार्यालयासमोर रोहिनाथ गौडा हे रस्ता क्रॉस करत असताना कोल्हापूर बाजूने आलेल्या ट्रकने रोहिनाथ गौडा यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या रांग लावली होती. घटनास्थळी अपघात विभागाचे पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली. याबाबत रात्री उशिरा कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.