शासन आपल्या दारी : कराड- पाटण मार्गावर विद्यार्थ्यांनी बसेस रोखल्या
कराड | कराड- पाटण मार्गावर आज सकाळी सुपने गावाजवळ शेकडो विद्यार्थ्यांनी एसटी बसेस रोखल्या. कराड आगार व्यवस्थापनाला निवेदन देवून व अधिकाऱ्यांनी आश्वासन देवूनही एसटी बस सुरू न झाल्याने रास्तारोको करण्यात आला. यावेळी एसटी बसचे कर्मचारी वैभव साळुंखे यांनी घटनास्थळी येवून काॅलेज विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्या संदर्भात चर्चा केली. तसेच आजच सुपने ग्रामपंचायत व विद्यार्थी यांच्याशी दुपारी एसटी अधिकारी यांची बैठक लावण्याचे आश्वासन दिल्याने तात्पुरता रास्तारोको मागे घेण्यात आला.
आज शुक्रवारी (दि. 25) सकाळी 6.30 वाजल्यापासून काॅलेजच्या विद्यार्थ्यांना एसटी बस थांबत नसल्याने 7 वाजल्यापासून या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसेस थांबवल्या. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थींनी यांच्यासह ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित जाधव, विनोद पाटील, पोलिस पाटील कमलेश कोळी, हिंदू एकता आंदोलनचे तुषार उर्फ गणेश पाटील यांनी विद्यार्थ्याच्या तीव्र भावना मांडल्या. यावेळी उपस्थितांनी एसटी आगाराचे वैभव साळुंखे यांच्याशी चर्चा करून तात्पुरते रास्तारोको आंदोलन मागे घेतले.
निवेदन देवूनही एसटी आगाराचे दुर्लक्ष : उपसरपंच अजित जाधव
गेल्या अनेक दिवसापासून सुपने गावाला सकाळी 7 व 9 वाजता स्वतंत्र एसटी बस मिळावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि विद्यार्थी यांनी निवेदन देऊनही एसटी महामंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने हे आंदोलन पुकारले. तीन- चार दिवसापूर्वी केवळ एकच दिवस एसटी बस आली, मात्र त्यानंतर पुन्हा शासन आपल्या दारी कार्यक्रमांचे कारण सांगून बस बंद केली. तेव्हा आमच्या गावच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सकाळी काॅलेजच्या विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करावी, अशी मागणी उपसरपंच अजित जाधव यांनी केली आहे.