दुष्काळी जनतेला न्याय देण्यात अपयश आल्यानेच थयथयाट : बाळासाहेब आटपाडकर
तुमचं व तुमच्या मालकाच कर्तृत्व सिध्द करा : भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदेवर पलटवार
दहिवडी | दहिवडी येथे युवक काँग्रेसने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे रास्ता रोको आंदोलन केले. त्या आंदोलनाची खिल्ली उडवत छावणी चालकांवर व आंदोलनाचे नेते रणजितसिंह देशामुख यांच्यावर टीका करणारे भाजपचे ताटाखालचे नेत्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्यात त्यांच्या मालकांना अपयश आल्याने शिंदेंचा थयथयाट सुरू असल्याचा पलटवार बाळासाहेब आटपाडकर यांनी केला आहे.
प्रसिध्दीला दिलेल्या पञकात आटापडकर म्हणाले की, कसलाही पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी या सरकारने ताबडतोब जनावरांच्या चारा छावण्या सुरू करणे गरजेचे होते. स्वतः काही करायचं नाही आणि बिनबुडाचे आरोप करत बसायचे. छावण्या चालकांवर आरोप करताना त्यात भाजपच्याच नेत्यांचा जास्त छावण्या होत्या, हिमंत असेल तर आधी त्यांची चौकशी करा. सरकार वेळेत छावणी चालकांना बीले देत नाही, म्हणून छावण्या काढण्यास कोण तयार होत नव्हते. तत्कालीन मंत्री महादेव जानकर यांच्या सुचनेनुसार आणि या भागातील पशुधन वाचावे म्हणून रणजितसिंह देशमुख यांनी मदत केली. शेतकऱ्यांची पिके वाळून गेली असताना पैसे भरुनही तुम्ही सत्तेचा गैरवापर करत राजकीय दबाव टाकून उरमोडीचे पाणी सोडत नाही. टँकरची मागणी असतानाही प्रस्ताव धुळ खात पडतात. हे तुमचे अपयश असल्याने व कोणतेही ठोस काम नसल्याने असे बिनबुडाचे आरोप करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचे हा तुमचा धंदा आहे.
निस्वार्थीपणे छावण्या सुरू केल्या, देशात पहिली शेळ्या- मेंढ्या छावणी सुरू करून गोरगरीब जनतेचे पशुधन वाचविले. त्याच देशमुखांच्यावर टीका करण्यापूर्वी आपली पात्रता व क्षमता तपासावी. माजी मंत्री महादेव जानकर यांनी नुकतेच रणजितसिंह देशमुख यांचे या योगदानाबाबत जाहीर कौतुकही केले. 21 दिवस खंड पडला किंवा पाऊस जर सरासरीच्या 50 टक्या पेक्षा कमी पडला तर विमा कंपनीला पैसे द्यावा लागतात हा अध्यादेश आहे. ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे द्यावीच लागणार आहे, यात तुमचे कर्तृत्व काय? असा सवालही विचारण्यात आला. आमसभा कोसोदूर साधी आढावा बैठक घ्यायची सुध्दा तुमच्या मालकाने धाडस दाखवले नाही.
सत्तेत असूनही तुम्ही कुचकामी ठरला
तुम्हाला खरोखरच जनतेचा कळवळा आहे तर तातडीने जनावरांच्या छावण्या सुरु करा. तुम्ही झारीतले शुक्राचार्य असाल तर छावण्या चालवा पण शेतकरी वाचवावा ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. शेतकरी संकटात असताना सत्तेत तुम्ही असुनही कुचकामी ठरला आहात. त्यामुळे लोकांबद्दल खोटी सहानभूती दाखवण्याची चमकोगिरी बंद करावी. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले ते यापुढेही आणखी तीव्र करु, असा इशाराही या वेळी आटापडकर यांनी दिला.