Satara News : जमिनीच्या फेरफारसाठी लाच घेताना तलाठी अडकला
म्हसवड । न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या फेरफारमध्ये नावांची नोंद करण्यासाठी 11 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून प्रत्यक्षात नऊ हजार रुपये स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. शेनवडी (ता. माण) येथील तलाठी तुकाराम शामराव नरळे (वय- 30, रा. पानवण, ता. माण) असे तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, की महिला तक्रारदार यांच्या चुलत सामन्याच्या शेनवडी (ता. माण) येथील साडेतेरा एकर जमिनीचा म्हसवड न्यायालयात हुकूमनाम्याचा आदेश होऊन साडेतेरा एकर जमीन तक्रारदार यांच्या पती व दिराच्या नावावर करण्याचे आदेश न्यायालयाने दिला होते. न्यायालयाच्या या आदेशानुसार जमिनीच्या फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी शेनवडीचे तलाठी तुकाराम शामराव नरळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ११ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती नऊ हजार रुपयाचे कबूल केले. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक -2 ला.प्र.वि. पुणे विजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सातारा श्रीमती उज्वल अरुण वैद्य, पो.ना.2028, निलेश चव्हाण, पो. ना .90 प्रशांत नलावडे , पो.शि.669 तुषार भोसले,पोना 2207,मारुती अडागळे यांनी कारवाई केली.