कराडला मराठा सकल समाजाच्यावतीने सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेट
कराड | जालना येथील अंतरवेली सराटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला. या हल्ल्यानंतर आता राज्यात ठिकठिकाणी आंदोलने तसेच बंदची हाक देण्यात येत आहे. अशावेळी कराड तालुका मराठा सकल समाजाच्यावतीने 15 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे. या काळात संबधित पोलिस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा 15 सप्टेंबरनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी आज शनिवारी कराडच्या दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन सरकारचा व प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी काही काळ कराड शहरात दत्त चाैकातून आत येणारी व बाहेर जाणारी आंदोलनकांनी रोखून धरली. तसेच सरकार व संबधित लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
कराड येथील दत्त चौकातून प्रशासकीय इमारत मार्गावर मोर्चाही काढण्यात आला. यावेळी कराड पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी स्वतः आंदोलकांशी संवाद साधला. तर प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलकांनी ठिय्या मांडत प्रशासनाला निवेदन स्विकारण्यासाठी रस्त्यावर यायला भाग पाडले. प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे व तहसिलदार विजय पवार यांनी यावेळी आंदोलकाचे निवेदन स्विकारले.
कराड तालुका बंदची हाक
जालना येथे ज्या आंदोलकांचे रक्त सांडले आहे, ते संपूर्ण समाजासाठी सांडले आहे. तेव्हा कराड तालुका व शहरातील लोकांनी आज बंद ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.