सातारा जिल्ह्यातील ‘या’ शाळांमधील 11 जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सातारा | जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांना दर वर्षी शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा प्रत्येक तालुक्यातून एक अशा 11 शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यंदा सन 2023-24 मधील प्राप्त प्रस्तावांमधून समितीमार्फत मूल्यांकन करून गुणांकनाच्या आधारे 11 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर, श्री. आडे उपस्थित होते.
पुरस्कार्थी शिक्षक व शाळेचे नाव पुढीलप्रमाणे ः- सीमा सुरेश पार्टे- (महू, ता. जावळी), ऊर्मिला जालिंदर पवार (पारगाव, ता. खंडाळा), अमिन शब्बीर शिकलगार (वाघेश्वर, ता. कराड), रफिक अब्बास मुलाणी शाळा (बनपुरी, ता. खटाव), उद्धव रामचंद्र पवार (अनपटवाडी, ता. कोरेगाव), गजानन सुरेश घुमाळ शाळा (कृष्णानगर, ता. सातारा), सुरेश अरविंद मोरे (शेंदूरजणे, ता. वाई), लक्ष्मण धोंडीबा जाधव (दुधगाव, ता. महाबळेश्वर), गणेश हौसेराव पोमणे (माझेरी, ता. फलटण), चंद्रकांत दिनकरराव कांबळे (नाटोशी, ता. पाटण), आकाराम पोपट ओंबासे (शेवरी, ता. माण) या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.