गमेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी : काॅटेजमध्ये उपचार सुरू
कराड | कराड तालुक्यातील गमेवाडी येथे बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाला असून संबधित शेतकऱ्यावर कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतात वानरांना दगड मारत असताना पाठीमागून येवून बिबट्याने शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीवर, हातावर व छातीवर बिबट्याने हल्ला केला. पोपट बाळकृष्ण जाधव असे जखमी झालेल्या 70 वर्षीय शेतकऱ्यांचे नाव आहे. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गमेवाडी येथे डोंगराकडेला असलेल्या कुंभर नावाच्या शिवारात पोपट जाधव हे आपल्या भुईमूग पिकांची राखण करण्यासाठी गेले होते. शिवारात वानरांनी मोठा धुमाकूळ घातल्याने वानरांच्या दिशेने श्री. जाधव यांनी दगड भिरकावले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या बिबट्याने पोपट जाधव यांच्यावर हल्ला केला. यामध्ये पहिल्यांदा पाठीवर, नंतर डाव्या हातावर व छातीवर हल्ला केला. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर कराडच्या काॅटेज हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास सदरील हल्ल्याचा प्रकार घडला. तेव्हा आजूबाजूला शिवारात अनेक शेतमजूर भांगलण तसेच शेतीची कामे करत होती. त्यांनी घटनास्थळी धाव घेत, यावेळी पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, राजेंद्र जाधव, सुरेश जाधव, वनसेवक मयुर जाधव यांनी जखमी पोपट जाधव यांना रूग्णालयात हलविले. या घटनेची माहिती मिळताच वनपरिमंडल अधिकारी बाबुराव कदम, वनरक्षक शंकर राठोड यांनी जखमींची भेटून विचारपूस केली.