Satara News : हिंदू- मुस्लिम शांतताप्रिय समाज रस्त्यावर उतरणार नाही
कराड | पुसेसावळी येथे दोन गटात झालेला राडा हा चुकीचा असून आम्ही हिंदू- मुस्लिम समाज शांतताप्रिय असून कोणीही रस्त्यावर उतरणार नाही. तसेच कराड शहरात किंवा अन्यत्र मोर्चा काढणार नसल्याचे हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुखांनी कराड येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पोलिस प्रशासनाला आश्वासन दिले.
कराड येथे पार पडलेल्या बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, कराडचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, जेष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर, अल्ताफ शिकलगार, फारुख पटवेगार, अजय पावसकर, चंद्रकांत जिरंगे, रूपेश मुळे, राहूल यादव, इसाक बागवान, रफिक मुलाणी, इसुफभाई पटेल यांच्यासह दोन्ही समाजातील प्रमुख लोक उपस्थित होते. पुसेसावळी येथील प्रकाराबाबत पोलिसांनी योग्य कारवाई सुरू असून कोणावर अन्याय होणार नसल्याचे सांगितले. तसेच समाजातील सर्वांचा विचार करून सर्वांनी येणारा गणेशोत्सव तसेच ईद- ए- मिलाद एकत्रित साजरी करून कराड शहराने एक आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्ष अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी व्यक्त केली.
यावेळी दोन्ही समाजातील प्रमुखांनी झालेला प्रकार दुर्देवी असून यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी. परंतु, ज्यांचा या घटनेशी संबध नाही, त्यांच्यावर अन्याय होवू नये. तसेच कराड शहर नेहमीच बंधूता जपत आलेले आहे. त्यामुळे सामान्य लोकांना त्रास होणाऱ्या गोष्टी करणार नाही. कराड शहरातच नव्हे इतरत्रही हिंदू किंवा मुस्लिम समाजातील कोणीही रस्त्यावर उतरणार नाही किंवा मोर्चा काढणार नाही, असे आश्वासन दिले.