कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि डाॅ. अतुल भोसले एकत्रित…फोटो पहा
– विशाल वामनराव पाटील
कराड दक्षिण मतदार संघात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले हे दोघेजण विधानसभा निवडणुकीला प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून रिंगणात असतात. तसेच या दोघांमधील व कार्यकर्त्यांमधील राजकीय विरोध हा सर्व सातारा जिल्ह्याला नव्हे तर अवघ्या राज्यातील राजकीय जाणकरांना आहे. मात्र, चक्क दोन्ही बाबा काल रात्री कराड शहरात एकत्रित शेजा- शेजारी बसलेले दिसून आले. कराडच्या सुसंस्कृतपणाचा एक भाग म्हणून लोक म्हणतील परंतु, या दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल असा प्रश्न सामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. हेही तितकेच खरे.
सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने कराड शहरातील गणेश मंडळांना राजकीय नेत्याकडून भेटीगाठी देण्यात येत आहेत. तसेच आरतीलाही हजेरी लावली जात आहे. मंगळवारी रात्री शहरातील बटाणे गल्लीतील एका मंडळात खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील आणि भाजपचे लोकसभा प्रभारी व कराड दक्षिणचे विधानसभा उमेदवार डाॅ. अतुल भोसले एकत्रित पहायला मिळाले. यावेळी चक्क कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शेजारीच खुर्चीवर डाॅ. अतुल भोसले बसलेले पहायला मिळाले. त्यामुळे उपस्थितांच्या नजरा या दोघांमध्ये काय चर्चा होणार याकडे लागून होत्या. परंतु, काही मिनिटांच्या वेळेत दोघांमध्ये कोणतीही चर्चा किंवा काहीच घडले नाही. त्यामुळे राजकीय उत्सुकता लागलेली ती काही क्षणांतच संपली.
चारही नेत्यांचा कराड शहरात मोठा गट
कराड शहराचा समावेश हा कराड दक्षिण मतदार संघात होत असल्याने व अनंत चतुर्थीला दोनच दिवस राहिल्याने नेतेमंडळींनी गणेश मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आ. पृथ्वीराज चव्हाण आणि डाॅ. अतुल भोसले यांच्यासाठी तर लोकसभा निवडणुकीसाठी खासदार श्रीनिवास पाटील तर पालिका निवडणुकीसाठी आ. बाळासाहेब पाटील यांना या शहरात आपला कार्यकर्ता व मतदार जपावा लागतो. तसेच या चारही राजकीय नेते मंडळीचा राजकीय गट आहे. त्यामुळे गणेशोत्सावाच्या निमित्ताने या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्याची संधी राजकीय नेत्यांना मिळत आहे. परंतु, आजही कराडच्या राजकारणात सुसंस्कृपणा या चाैघांच्या एकत्रित येण्याने पहायला मिळाला. (छायाचित्र- किरण पांढरपट्टे, कराड)