पर्यटक अडकले : येवतेश्वर आणि महाबळेश्वर घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रशासन सुस्त

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सलग सुट्ट्यांमुळे सातारा जिल्ह्यातील कास, महाबळेश्वर येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. पर्यटकांच्या गर्दीसोबत संपूर्ण सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार पहायला मिळाली. पश्चिम भागातील निसर्गसंपन्न असलेल्या कास पठार आणि महाबळेश्वरला पावसाने झोडपल्याने पर्यटकांना प्रवास करताना ट्रॅफिकचा सामना करावा लागला. सकाळी जाताना आणि घरी परतताना पर्यटकांना या दोन्ही ठिकाणी अडचण झाल्याचे पहायला मिळत असून अनेक पर्यटक या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. अशावेळी या ठिकाणी पोलिस किंवा प्रशासनाचे कोणीच दिसत नसल्याने पर्यटकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
सातारा- येवतेश्वर घाटात पाच किलोमीटरची मोठी वाहनांची रांग लागलेली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कास पठारवर फुलांचा हंगाम बहारलेला असल्याने तो पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. कास- बामणोलीकडे पर्यटकांचा अोढा आज मोठा दिसून आला. कास येथे प्रशासन तसेच समितीकडून नियोजनाची कमी दिसत असल्याने प्रशासनाचा नाकार्तेपणामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महाबळेश्वर, पाचगणी याठिकाणी पावसाचा तसेच निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना परतताना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली. परिणामी वाहतूक संथ गतीने सुरू होती. तसेच रविवार आणि उद्या सोमवारी सुट्टी असल्याने हाॅटेल व राहण्याची इतर ठिकाणी फुल्ल असल्याने पर्यटकांची गैरसोय झालेली पहायला मिळत आहे.



