मसूरला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न समन्वयातून सोडवावा अन्यथा रास्ता रोकोचा इशारा
न्यायालयीन लढाई लढण्याची ग्रामस्थांची तयारी
मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
मसूरला रस्ता रुंदीकरणाच्या बाबतीत बांधकाम खात्याने लोकशाही मार्गाने समन्वयातून लोकांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढावा असे आवाहन ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केले.. पाडापाडीचा मार्ग अवलंबला तर रस्ता रोको आंदोलनासह न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही दिला. कराड – मसूर रस्त्याचे चौपदरीकरण व मसूर – उंब्रज रस्ता लांबीचे सुधारिकरण होणार असल्याच्या भीतीने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. रस्ते विकासाच्या नावाखाली व्यावसायिक जीवनमान उद्ध्वस्त होऊन भकाशीकरण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नागरीवस्तीतील ग्रामस्थ व बांधकाम खात्याच्या समन्वयातून नियम शिथिल करून मूळच्या हद्दीतील नाल्यावरच हद्द कायम केल्यास त्यास मसूरकरांचा विरोध नाही अशी स्पष्ट निर्धारित भूमिका देखील मांडण्यात आली. राजकारणविरहित एकसंघटित झालेल्या मसूरकरांची पत्रकार परिषद महत्वपूर्ण व चर्चेची ठरली.
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय शिरतोडे, रमेश जाधव,सुनील जगदाळे, दिग्विजयसिंह जगदाळे, माजी उपसरपंच सावळाराम कांबळे, बाजीराव वायदंडे, सदाशिव रामुगडे, नितीन जगदाळे, संजय काशीद, सचिन जगदाळे, विजय पाटील, विकास जाधव, काकासो पाटील, नानासो जगदाळे, प्रकाश कांबिरे, मारुती वाघमारे, राजेंद्र कानाडे, विशाल मोहिते, धनंजय महाजन यांच्यासह विविध व्यावसायिक, उद्योजक, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भूमिका स्पष्ट करताना ग्रामस्थ म्हणाले अगोदरच मसूर बाजार व व्यापार पेठेचे महत्त्व संपुष्टात येत आहे. त्यातच कोरोनाच्या दोन लाटेत व्यवसायिकांचे कंबरडे मोडले. व्यापारपेठ सोडून मसूर – उंब्रज व कराड – मसूर रस्त्यात दोन्ही बाजूला अनेकांनी व्यवसाय थाटले. वर्षानुवर्षे बस्थान बसलेले व्यवसाय मोडीत निघून मसूरचा चेहरा विद्रूप होण्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मसूरकर राजकारण विरहित एकवटले आहेत. बांधकाम खात्याने लोकशाही मार्गाने समन्वयातून लोकांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढण्याची व दोन्ही बाजूकडील लोकवस्तीतील नियम शिथिल करा. कोरेगाव, मायणी, पुसेसावळी, पुसेगाव, कोपर्डे हवेली याच धरतीवर मसूरचे दोन्ही बाजूकडील रस्ता विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
गावच्या पश्चिमबाजूला मागासवर्गीयांची घरे, व्यवसाय असून भूमिहीन मागास समाजाला आणखी बेघर करणार का ? मसूर रेल्वे पुलाचे रुंदीकरण करणार का ? कब्जा पट्टीचा व पूर्वजांनी मोबदला घेतल्याचा पुरावा आहे का ? वीस वर्षानंतर मोबदल्याबाबत तक्रार न केल्यास ती जागा शासनाची होती तो नियम असल्यास दाखवावा. जागेचा ताबा घेतल्यावर तीन वर्षात त्याची कब्जेपट्टी करून उताऱ्यावरील क्षेत्र कमी न केल्यास ती जागा मूळ मालकाचीच असते हा नियम आहे. परंतु प्रत्येक वेगळी मापे टाकून लोकांच्या संभ्रम निर्माण होत आहे. तहसीलदार व बांधकाम खाते यांचे नियम वेगळे आहेत का ? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.बांधकाम खाते माहितीच्या अधिकाराखाली माहिती देत नाही ही बाब दुर्दैवी आहे.
शासन एकाचवेळी एका कुटुंबाचे किती वेळा नुकसान करणार
प्रा. कादर पिरजादे म्हणाले, माझे वडिलोपार्जित मालकीची आरफळ कॅनॉलसाठी 18 गुंठे, वाघेश्वर रस्त्याला दोन एकर, कराड मसूर रस्त्यासाठी 41 गुंठे, पागे स्कीमला बारा गुंठे असे चार वेळाक्षेत्र गेले आहे. असा आघात माझ्यासह अनेक कुटुंबावर झाला आहे. तेव्हा आणखीन किती कुटुंबावर शासन अन्याय करणार आहात असा सवाल उपस्थित केला….!
मसूर विद्रूप झाल्यावर ग्रामसभा घेणार का ? ग्रामस्थांचा परखड सवाल
मसूरच्या व्यावसायिकतेचा चेहरा उध्वस्त होण्याची वेळ आली. अनेक कुटुंबीय रस्त्यावर येणार आहेत. याचे गांभीर्य मसूर ग्रामपंचायतीस अद्याप नाही. याप्रकरणी काही सदस्यांनी ग्रामसभा घेऊन हा प्रश्न समन्वयातून सोडवण्याची भूमिका घेतली तरी ग्रामसभा घेण्यास चालढकल सुरू आहे. ही बाब दुर्दैवी असून मसूरकरांच्या गंभीर प्रश्नाबाबत ग्रामसभा न घेणे यामध्ये गौडबंगाल काय ? असा सवाल असा ग्रामस्थांनी व्यक्त केला. काही मुठभर लोकांना व्यवसाय उद्धवस्तीकरणाची का घाई आहे. त्यांच्यात जनतेची समस्या सोडवण्यात उदासीनता का आहे. परंतु जनता जागृत आहे. त्याचा योग्य वेळी विचार होईल. याबाबत झारीतील शुक्राचार्य कोण ? असे सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केले….!