यशवंतराव चव्हाण साहेबांचा मानसपुत्र अन् राष्ट्रवादीचा बाप एकच… शरद पवार : अजित पवार गटावर हल्लाबोल
कोरेगाव येथे आ. शशिकांत शिदेंच्या वाढदिवसाला विरोधकांवर हल्लाबोल
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
स्व. यशवंतराव चव्हाण यांचा काही लोक फोटो मागतात, फोटो वापरून कृती दिसत नाही. नुसता फोटो लावून उपयोग नाही, संस्कार पाहिजेत. फोटो लावून काम होत नाहीत. महाराष्ट्रात चव्हाण साहेबांचा फोटो कोणीही लावतं पण त्यांचा मानसपुत्र आणि राष्ट्रवादीचा बाप एकच आहे अन् त्याचं नाव शरद पवार आहे. महाराष्ट्र कधीही हे विसरू शकत नाही, असा हल्लाबोल अजित पवार गटावर खा. सुप्रिया सुळे यांनी केला.
दिल्लीच्या महाशक्तीची महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान
तुम्हाला आदृश्य शक्ती सर्वकाही दिलं. शिवसेना किंवा राष्ट्रवादीतून जे बाहेर गेले ते त्यांची कृती करत नाहीत. दिल्लीची महाशक्ती, अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते. शिवसेना एकच आहे, त्याचे अध्यक्ष उध्दव ठाकरे हेच आहेत. तसचं राष्ट्रवादी पक्षाचं आहे, आमच्यातील एक गट बाजूला झाला. इलेक्शन कमिशन मध्ये शरद पवार स्वतः 5 तास बसून होते. तर ज्यांना पक्ष पाहिजे त्याच्यातील कोणीही नव्हतं. आई- मुलाचं नातं असतं, तसचं शरद पवार आणि राष्ट्रवादीचं नात आहे. कोणीही काही म्हणू द्या. राष्ट्रवादीचा मायबाप एकच आहे अन् त्या माणसाचं नाव शरद पवार आहे.
भाजपाने देवेंद्र फडणवीसांना फेल केलं
महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच अदृश्य शक्तीनं केलं. परंतु, त्यांनी भारतीय जनता पक्षालाही सोडलं नाही. देवेंद्र फडणवीसांना 10 पैकी 10 मार्क द्यायला पाहिजे होते, त्यांनी 105 आमदार निवडूण आणले. त्यांना मुख्यमंत्री न करता उपमुख्यमंत्री केलं. तेथे त्यांना 5 मार्क दिले. त्यानंतर आणखी एक उपमुख्यमंत्री आणून अडीच मार्क काढले म्हणजे केवळ देवेंद्र फडणवीसांना अडीचच मार्क दिले. तेव्हा पाससाठी 35 टक्के लागतात, परंतु त्यांना फेल केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा घातही या अदृश्य शक्तीने केला आहे. आणखी एक व्यक्ती नितीन गडकरी यांचेही अधिकार काढण्याचं पाप याच महाशक्ती, अदृश्य शक्तीने केलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील दोन्ही माणसाच्यांत एकच साम्य आहे, ते म्हणजे हे सर्व मराठी आहेत. माझी लढाई या माणसांच्या बरोबर नाही, माझी लढाई या अदृश्य हाताबरोबर आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आमच्यावर झाले आहेत, त्यामुळे दिल्लीवरून या महाशक्तीला हालविल्याशिवाय मी सुप्रिया सुळे नाव सांगणार नाही.
आ. महेश शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाईंवर टीका
अधिकाऱ्यांशी उर्मट भाषेत बोलले ते आ. महेश शिंदे आता सत्तेत आहेत, अजून 10 महिने राहतील. सत्ता आहे म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्यांवर चुकीची केस केली, तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे, हे लक्षात ठेवायचं. आज जे- जे पोलिस भरती झाले आहेत, ते माझे जेष्ठ बंधू कै. आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री होते, तेव्हा भरती झाले आहेत. आम्ही पोलिसांचा गैरवापर केला नाही. आता तुमच्या जिल्ह्यात एक मंत्री आहेत, त्याच्याकडे उत्पादन शुल्क खात आहे. त्यांच्याकडून दारूची दुकान वाढतायत अन् शाळा कमी होतायत.