पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्नामुळे नाणेगाव खुर्दचा रस्ता झाला खुला
उंब्रज प्रतिनिधी | श्रीकांत जाधव
चाफळ विभागातील नाणेगाव खुर्द येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साकव पूलाचे काम मंजूर केले होते. या साकव पूलाचे काम सध्या पूर्ण झाले असताना येथील पोहोच रस्ता गावातील वहीवाटीला बंद केला होता. यामुळे नाणेगाव येथील ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे नाणेगाव येथील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कारखाना कार्यस्थळावर भेट घेऊन त्यांनी दररोज येणाऱ्या अडचणींचे गाऱ्हाणे त्यांचेसमोर मांडले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट विद्यार्थ्यांकडे जाऊन त्यांना दररोज ये- जा कसे करता याची आपुलकीने विचारपूस केल्यानंतर त्यांनी तातडीने तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना नाणेगाव खुर्द येथील रस्ता तातडीने खुला करण्याच्या सूचना केल्या होत्या. पालकमंत्र्यांच्या सुचनेवरुन आज तालुका प्रशासनाचेवतीने उपविभागीय अधिकारी सुनील गाडेसे, तहसिलदार रमेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे एपीआय उत्तम भापकर, अजित पाटील, गट विकास अधिकारी शेलार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे भोसले हे अधिकारी आज दिवसभर नाणेगाव खुर्द येथे रस्ता खुला करण्यासाठी ठाण मांडून होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे आज नाणेगाव खुर्द येथील रस्ता खुला झाल्याने येथील ग्रामस्थांसह महिला, शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
नाणेगाव खुर्दचा रस्ता कायमस्वरुपी खुला झाल्याने नाणेगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आभार मानले. त्याचबरोबर चाफळ विभागातील संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळूंखे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, माजगावचे उपसरपंच गोरख चव्हाण, कडववाडीचे माजी सरपंच शिवाजी बोंगाणे, मनोहर कडव या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.