ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर केल्यास न्याय मिळणार : अजय भोसरेकर
मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
रचनात्मक कामासाठी प्रबोधनाद्वारे, विचाराने ग्राहक कायद्याचा जन्म झाला. ग्राहक न्यायासाठी ग्राहक चळवळ सुरू झाली. ग्राहक चळवळीच्या संघटितपणाला बळ देण्याचा प्रयत्न सुरू केला. ग्राहक संरक्षण कायद्याचा योग्य पद्धतीने वापर केला, तरच न्याय मिळणार असल्याचे स्पष्ट मत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अजय भोसरेकर यांनी माळवाडी- मसूर (ता. कराड) येथील ऍड. दादासाहेब चव्हाण विद्यासंकुलातील विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी व ग्राहक चळवळ’ या विषयावर मार्गदर्शन करताना केले.
जागृत ग्राहक राजा सामाजिक संस्थेचे राज्य अध्यक्ष दिलीप फडके, राज्य संघटक दिलीप पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. नागनाथ स्वामी, जिल्हा संघटक प्राचार्य विक्रम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष रामानंद गुरव, सचिव विद्याधर कुलकर्णी, तालुका अध्यक्ष गजानन गिरी, सदस्य सदाशिव रामुगडे उपस्थित होते.दिलीप पाटील, प्रा. नागनाथ स्वामी, रामानंद गुरव यांनीही जागृत ग्राहकराजा संघटनेचे कार्य व ग्राहक हितासंबंधीची माहिती विषद केली. प्राचार्य विक्रम शिंदे यांनी ऑनलाइन फसवणूक झाल्यास न्याय मागू शकतो.
श्री. भोसरेकर म्हणाले, ग्राहक कायद्यासाठी संघर्ष झाला. पण त्यासाठी मोर्चा, उपोषण नाही. राष्ट्रीय संपत्ती जाळली नाही. तर फक्त लेखणी युद्धाचा विचार झाला. विद्यार्थ्यांनीही ग्राहक हितासाठी ग्राहक चळवळीत झोकून द्यावे. संघटन करून ग्राहकांची संघटित शक्ती उभी करावी लागेल. मन, बुद्धी, आत्मा, ग्रहण करतो, तो ग्राहक असतो. ग्राहकावर अन्याय झाला तर त्यास होणाऱ्या मानसिक त्रासाचे मूल्य जाणणारा ग्राहक संरक्षण कायदा आहे.
दिलीप फडके म्हणाले, राज्यातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे ग्राहकराजा ही चळवळ बनलेली आहे. ग्राहकांना नवी दिशा,नवा विचार देण्याचे काम सुरू आहे. ग्राहकराजा संघटनेचे महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यात संघटनाद्वारे काम सुरू आहे. 50 तालुक्यात प्रभावीपणे काम सुरू आहे. ग्राहक चळवळीचा मंत्र समाजाच्या सर्व थरात पोहोचला पाहिजे. ग्राहक जागृतीसाठी ग्राहकांना अधिकार, कर्तव्यांची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे.