शिखर शिंगणापूरचे माजी सरपंच अपघातात जागीच ठार : घटना सीसीटीव्हीत कैद
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा- पंढरपूर महामार्गावर कुमठे (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत हॉटेल दरबार समोर दुचाकीच्या झालेल्या अपघातात शिखर शिंगणापूरचे (ता. माण) माजी सरपंच अभय रामचंद्र मेनकुदळे (वय- 55 वर्ष) अपघातात जागीच ठार झाले. तर त्याच्या सोबत दुचाकीवर बसलेले सहकारी किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव येथील वीर शैव समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोकराव उमरदंड यांचे जावई शिखर शिंगणापूरचे माजी सरपंच अभय रामचंद्र मेनकुदळे व त्यांचा साथीदार दुचाकीवरून कोरेगावच्या बाजूला येत असताना अपघात झाला. या अपघातात माजी सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबतचे बसलेले किरकोळ जखमी झाले. समाजाबद्दल तळमळ व सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या उमदे व्यक्तिमत्वाचे अभय मेनकुदळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच वीरशैव समाज बांधव मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ दोघांना उपचारार्थ रुग्णालयात हलविले.
घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. सदरील अपघाताची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. माजी सरपंच अभय मेनकुदळे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे.