साजूरमध्ये बिबट्याचा जर्मन शेपर्ड कुत्र्यासह शेतकऱ्यावर हल्ला : खळबळ उडाली
कराड | साजूर (ता. कराड) येथे बिबट्याने जर्मन शेपर्ड कुञ्यावर हल्ला केला असता कुत्र्याला वाचवायला गेलेल्या मालकावरही बिबट्याने झेप टाकली. यावेळी शेजारी असलेल्या भागवत कुभांर यांच्या सतर्कतेमुळे मालक थोडक्यात बचावला असून दोघांनी आरडा ओरड केल्याने दुर्घटना टळळी. मात्र जर्मन शेपर्ड कुत्र्याचा तसेच परिसरात असलेल्या मोर आणि सशाचा बिबट्याने फडशा पाडला. या हल्ल्यामुळे साजूरसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे.
याबाबतची घटनास्थळावरील माहिती अशी, साजूर येथे कोयना नदीकाठी पाळसकर वस्ती असून तेथे दिपक पाळसकर यांच्या जर्मन शेपर्ड कुञ्यावर बिबट्याने हल्ला केला. बुधवारी दुपारच्या सुमारास हा हल्ला झाला असून मालक दिपक पाळसकर कुत्र्याला वाचवायला गेले होते. तेव्हा बिबट्याने कुञ्याला सोडून मालकावर झेप टाकली. यावेळी शेजारी असलेल्या भागवत कुभांर यांनी जोराजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्याने कुञ्याला ठार करून ऊसात धूम ठोकली.
या प्रकारामुळे झाडावर असलेल्या वानरांनी मोठा गोंधळ केला. या घटनेची माहिती मिळताच उपसरपंच संदीप पाटील, सुधीर कचरे, मुकुंद कचरे, सागर चव्हाण, सुरेश कचरे यांच्यासह गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.