‘एक मराठा, लाख मराठा’! कराडला सोमवारी मराठ्यांचा एल्गार
कराड | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू असून त्याच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी उपोषण, आंदोलन केले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातूनही या उपोषणाला पाठिंबा दिला जात असून राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कराड तालुका सकल मराठा मोर्चा समाजाच्या वतीने सोमवारी (दि. 30) तहसील कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता दत्त चाैकातून मोर्चाला सुरूवात होणार आहे.
कोल्हापूर नाका येथील सोनाई मंगल कार्यालयात आज कराड तालुका सकल मराठा मोर्चा समितीची बैठक पार पडली. कराड तालुक्यातील सकल समाजाच्या वतीने या मोर्चाला कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघातून सर्व गावांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चात संपूर्ण कुटुंबासह मराठा समाजाने सहभागी होवून शासनाला जाग आणावी. यासाठी कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून निवेदन देण्यात येणार आहे. मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कराड शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कराड तालुक्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी प्रभातफेरी काढून जनजागृती केली जात आहे. आता कराड तालुक्यातील मराठा समाजाचा आवाज शासनाला आणि सरकारला गेला पाहिजे, याकरिता हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाचा मार्ग पुढीलप्रमाणे ः- मराठा सकल समाजाने सकाळी 10 वाजता कराड शहरातील दत्त चाैक येथे एकत्रित यायचे असून तेथून दत्त चाैक- चावडी चाैक- जोतिबा मंदिर- आंबेडकर पुतळा- काॅटेज हाॅस्पीटल- विजय दिवस चाैक- कराड बसस्थानक- दत्त चाैक तेथून पुढे कराड तहसील कार्यालय असा मार्ग असणार आहे.
मोर्चाला येणाऱ्या लोकांसाठी पार्किंग व्यवस्था ः- तांबवे, सुपने, उंब्रज, वहागांव, तळबीड, चरेगाव येथून येणाऱ्या मराठा बांधवांनी दैत्य निवारणी मंदिर परिसरात वाहने पार्किंग करावी. विंग, कोळे, चचेगांव, येरवळे या ठिकाणाहून येणाऱ्यांनी पंकज हाॅटेल पाठिमागे वाहने पार्किंग करावीत. काले, उंडाळे, अोंड, आटके, रेठरे, वाठार या परिसरातून येणाऱ्या बांधवांनी पी. डी. पाटील उद्यान परिसरात वाहने पार्किंग करावीत. वडगांव, शेरे, शेणोली, कार्वे, खुबी या परिसरातून येणाऱ्यांनी बाजार समिती- भेदा चाैक परिसरात वाहने पार्किंग करावीत. तर करवडी, अोगलेवाडी, मसूर, कोपर्डे, अंतवडी, शामगाव, किवळ, शिरवडे परिसरातील बांधवांनी शिवाजी हायस्कूल- शिवाजी स्टेडियम परिसरात वाहने पार्किंग करावीत.