सह्याद्री कारखाना प्रति दिन 11000 मॅट्रिक टन गाळप करणार : आ. बाळासाहेब पाटील
मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
सह्याद्री कारखाना चालू हंगामात प्रतिदिन अकरा हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप करणार असल्याची माहिती सह्याद्री कारखान्याचे चेअरमन व आमदार बाळासाहेब पाटील यांनी यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 2023 – 24 या सुवर्णमहोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी बोलताना दिली. हंगामासाठी ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे नोंदवलेला ऊस सह्याद्री कारखान्यालाच घालावा असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहाजी क्षीरसागर, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे, तानाजीराव साळुंखे, प्रवीण ताटे, माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील,जसराज पाटील, उद्धवराव फाळके, संभाजीराव गायकवाड, कांतीलाल पाटील उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले कारखानदारी सध्या आव्हानात्मक स्थितीत आहे. कारखान्याचा पहिला हंगाम 1974 ला झाला. 50 वर्षात कारखान्याने अनेक चढउतार पाहिले. यशवंतराव चव्हाणांच्या संकल्पनेतून कारखाना उभारला. ज्येष्ठ नेते पी डी पाटील यांच्या प्रयत्नाने कृष्णा कोयना नदीतून लिफ्ट इरिगेशन झाली. विशेषता स्वतःहून ऊस पिकवणारा सह्याद्री कारखाना आहे. नैतिकदृष्ट्या विचारातून सभासदांनी सह्याद्रीलाच ऊस घालावा. कारखान्याने प्रतिदिन एक लाख लिटर इथेनॉल उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. चालू हंगामापासून पूर्ण क्षमतेने इथेनॉल निर्मिती होईल. कारखाना कार्यक्षेत्रात सभासद व बिगर सभासदांचा 21 576ॱ 21 हेक्टर ऊस कारखान्याकडे नोंद झालेला आहे.कारखान्याने 392 ऊस तोडणी टोळ्या, 836 बैलगाड्या, 374 ट्रॅक्टर गाड्या, अकरा ऊस तोडणी मशीन अशी तोडणी यंत्रणा उभारलेली आहे. चालू गळीत हंगामासाठी कारखान्याने व्हीएसआय कडून ऊस तोडणी प्रोग्रॅम तयार करून घेतलेला आहे. सभासदांना साखर गावोगावी पोच केली आहे.
सुनील माने म्हणाले सह्याद्रीचे गाळप हंगामाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यासंदर्भातील सोनेरी पान पुस्तकी रूपात यावे. ज्येष्ठ नेते पी डी पाटील यांनी सभासदांचे जीवनमान उंचावले. 50 वर्षांपूर्वी मागे गेलो तर कठीण परिस्थिती होती. आता आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने तांत्रिक बाबीमुळे कारखान्याची प्रगती झाली. आता सहकार जपायची आपली नैतिक जबाबदारी आहे.
देवराज पाटील म्हणाले यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या कारखान्याला पी डी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने सह्याद्री कारखाना प्रगतीपथावर राहिला. कारखान्याचा नेट नेटकेपणा, शिस्त, पारदर्शकता आदी बाबीमुळे कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले. ड्रिप इरिगेशनसाठी कारखान्याने सभासदांना प्रोत्साहन दिले. परिणामी ऊस उत्पादन चांगल्या प्रमाणात वाढले. सभासदांची आर्थिक उन्नती झाली. संपूर्ण राज्यात सह्याद्री कारखाना अग्रेसर राहिला. शहाजी क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले. सुनील माने यांच्या हस्ते आमदार बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.सह्याद्री कारखानाच्या संचालकांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. दादा पाटील व आर जी तांबे यांनी सूत्रसंचालन केले. मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले.