कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

सह्याद्री, कृष्णा, रयत आणि जयवंत शुगरला शेतकऱ्यांचे निवेदन : मागील 500 अन् पहिली उचल 3500

कराड ः- तालुक्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र अद्यापही यावर्षीच्या हंगामाचा ऊसदर कुठल्याच कारखान्याने जाहीर केलेला नाही. यासाठी कराड तालुक्यातील सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सह्याद्री, कृष्णा, रयत तसेच जयवंत शुगर या कारखान्यावर जाऊन लेखी निवेदन दिले. तसेच सर्व कारखान्यांच्या अधिकारी वर्गाशी चर्चा करून चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल 3 हजार 500 त्याचरोबर गत हंगामातील दुसरा हप्ता 500 रुपये देण्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लेखी निवेदनात म्हटले आहे की, व्यावहारिकदृष्ट्या मार्केटमध्ये प्रत्येक वस्तूची किंमत उत्पादक ठरवतो. मात्र शेतकऱ्याच्या शेतमालाची किंमत ठरविण्याचा अधिकार उत्पादक शेतकऱ्यांना नाही. यात उसाचाही समावेश आहे. उसाच्या दराची कुठलीही पूर्वकल्पना न देता कारखाने शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेत असतात. यावर्षी सरकारनेही ऊसदरा बाबतीत योग्य धोरण अवलंबिले नाही, असे असताना कारखाने मात्र ऊस तोडून नेत आहेत. शेतकरीही नाईलाजाने ऊस देत आहेत. गेले वर्षभर साखरेचे दर तेजीत आहेत, त्याच बरोबर इथेनॉल, उपपदार्थ निर्मिती, को- जनरेशन प्रकल्प इत्यादी अनेक उत्पादनापासून साखर कारखान्यांना भरघोस नफा मिळत आहे. असे असताना गेल्या 6 ते 7 वर्षापासून ऊसदर 2800 ते 3000 या पटितच अडकवून ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या भांडवली खर्चात मात्र गेल्या 6/7 वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णतः कोलमडले आहे. यावर्षी तर भीषण दुष्काळ आहे. अपुऱ्या पावसामुळे उसाचे उत्पादन पन्नास टक्के घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीककर्ज सुध्दा फिटणार नाही, अशी परिस्थिती आहे. पाणी टंचाईमुळे नवीन ऊसलागणी, खोडवा पीक राखण्या संदर्भात साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात शेतकरी प्रचंड अडचणीत येणार आहेत.

वास्तविक, साखर कारखानदारीचा मुख्य कणा हा ऊस उत्पादक शेतकरी आहे. साखर कारखाने, सहकार क्षेत्र आणि सर्वच क्षेत्रातील प्रगती आणि विकासाचा मुख्य घटक शेतकरीच आहे. असे असताना शेतकऱ्यांचा कच्चा माल असणाऱ्या उसालाच योग्य किंमत मिळत नाही. परिणामी शेतकरी सततच्या तोट्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत आले आहेत. भविष्यात शेतकरी उध्वस्त झाला तर सहकार क्षेत्र आणि साखर कारखाने यांच्याही भविष्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. तरी शेतकऱ्यांना योग्य दर देऊन शेतकरी आणि कारखानदारी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य दर मिळणे काळाची गरज आहे. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराड तालुका पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Swamiratna Jewelers Malharpet

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker