रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांवर खंडणीचा गुन्हा : दिवाळीसाठी 50 हजाराची मागणी
सातारा | भुसार माल खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदाराला दिवाळीसाठी 50 हजारांची खंडणी मागितल्या प्रकरणी रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांवर तालुका पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव (सध्या रा. कोयना सोसायटी सदरबझार, सातारा, मूळ रा. कोरेगाव), हणमंत बाबूराव सावळे (रा. शिवथर, ता. सातारा) अशी नावे आहेत. याबाबत योगिता प्रसन्ना राजमाने (रा. आरळे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
योगिता राजमाने यांचे आरळे येथे स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाचे भुसार माल खरेदी-विक्रीचे दुकान आहे. डिसेंबर 2021 मध्ये त्यांना मधुकरने फोन करून दिवाळीसाठी 50 हजार रुपये द्या, अशी मागणी केली होती. त्यावेळी राजमाने यांनी पैसे देण्यास नकार दिला. जानेवारी 2022 मध्येही राजमाने यांना फोन करून पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली. पैसे न मिळाल्यास ‘तुझ्याविरुद्ध आम्ही बाजार समितीत बोगस मालाबाबत तक्रार करू,’ अशी धमकी त्या वेळी दिली. त्यामुळे राजमाने यांनी त्यांच्या पत्नीच्या फोन पेवरून 10 हजार त्यांना पाठविले. त्यानंतर दोघे पुन्हा आले नाहीत.
दरम्यान, दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी बाजार समितीमधून सचिन मोरे यांनी फोन करून ‘तुमच्याविरुद्ध मधुकरने तक्रार केली आहे. तुम्ही येथे या,’ असे त्यांना सांगितले. राजमाने हे बाजार समितीत गेले असता तेथे वरील संशयित होते. राजमाने मोरे यांना भेटल्यानंतर त्यांनी मालाच्या पावत्यांवर व्यवस्थित सह्या करा, असे सांगितले. याचवेळी मधुकर जाधव व हणमंत सावळे यांनी राजमाने यांच्याकडे दिवाळीसाठी पुन्हा 50 हजारांची खंडणी मागितली. या प्रकारानंतर राजमाने यांनी घरी जाऊन त्यांच्या पत्नीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांची पत्नी योगिता राजमाने यांनी पोलिसात फिर्याद दिली.