मनसे केसरी 2023 : साताऱ्याची बलमा आणि सुंदर बैलजोडी ठरली मानकरी
कोरेगाव येथे मनसेचे अमित ठाकरे यांचे हस्ते बक्षीस वितरण
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
कोरेगाव येथे भैरवनाथ रथोत्सवानिमित्त आयोजित मनसे केसरी 2023 चा किताब सातारा येथील अक्षय शिवाजी गिरी यांच्या ‘बलमा’ आणि शिरसाठवाडी येथील भाऊ भुजबळ यांचा ‘सुंदर’ या बैलांच्या गाडीने पटकावला. ‘एक आदत, एक बैल’ अशी बैलगाडी शर्यत पार पडली. विजेत्या पहिल्या क्रमांकाच्या बैलगाडीला हिरो कंपनीच्या दोन दुचाकी बक्षीस देण्यात आल्या. बक्षीस वितरण समारंभ मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोरेगाव तालुका आणि येथील चौथाई गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्राचा मनसे केसरी, एक आदत, एक बैल’ अशा बैलगाडी शर्यत भरण्यात आली होती. मैदानाचे उद्घाटन सकाळी मनसे कोरेगाव तालुकाप्रमुख सागर बर्गे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. या शर्यतीमध्ये 507 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. एकूण 58 प्राथमिक फेऱ्या आणि नऊ उपांत्यपूर्व फेऱ्या झाल्या. एका फेरीत नऊ गाड्या सोडल्या जात होत्या.
मनसे केसरी बैलगाडी शर्यतीचा निकाल पुढीलप्रमाणे
शर्यतीत आई गावदेवी प्रसन्न गुड्डी रतन म्हात्रे व अक्षय राजेंद्र गिरी (सातारा) यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक मिळवत हिरो कंपनीची एक दुचाकी बक्षीस म्हणून पटकावली. संत बाळू मामा प्रसन्न हर्षलभाऊ पायगुडे (कुडजे) यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक मिळवत 51 हजार, राजनंदिनी नंद सागडे (गराडे) यांच्या बैलगाडीने चतुर्थ क्रमांकासह 31 हजार, रणजित खाडे पोलिस (पळशी) यांच्या बैलगाडीने पाचव्या क्रमांकासह 21 हजार रुपये बक्षीस पटकावले. उत्तेजनार्थ हिंदवी विजय मतकर (करंजे), शिवशंकर डेअरी फार्म (आंबेगाव) व आई तुळजा भवानी प्रसन्न बकिरामआप्पा शेळके व अक्षय शिंदे (कोरेगाव) यांच्या बैलगाडीने उत्तेजनार्थ प्रत्येकी 11 हजार रुपयांचे बक्षीस मिळवले.