कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

सातारा जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक : दूध वाहतूक थांबविण्याचा दिला इशारा

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके 
सातारा जिल्ह्यात पूर्ण दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून कमी पर्जन्यवृष्टीमुळे पिके हातातून गेली. आता शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून असताना दूधाला योग्य दर नाही. शेतकरी अडचणीत असताना सरकारला याचे काही घेणेदेणे नसून सरकार जाती-धर्माच्या रंगात गुंतलेले आहे. तेव्हा आगामी दोन दिवसाच्या आत सरकारने दूध दराचा निर्णय घ्यावा, अन्यथा दूध वाहतूक थांबविण्याचा इशारा सातारा जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे. यावेळी वर्धनगड येथे रस्त्यावर दूध ओतून रास्तारोको केला.

शिवसेनेचे प्रताप जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यात पाऊस समाधानकारक न झाल्याने चारा अभावी पशुधन सांभाळणे अडचणीचे बनले आहे. हातची पिके करपून गेली असून आता फक्त दुग्ध व्यवसाय शेतकऱ्याचा उत्पन्नाचे साधन राहिले आहे. अशा परिस्थितीत दूधाला 27- 28 रुपये लिटर दर आत्ता शासन देत आहे. याचा जमा खर्च काढला असता शेतकऱ्याच्या हातात काही शिल्लक राहत नाही. पॅकिंगचे दूध 60 रुपये लिटरने आणि शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे दूध 27 रुपये लिटर हा कोणता न्याय म्हणायचा. तेव्हा शासनाने यावर गांभीर्याने निर्णय घेणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यात अन्न भेसळ विभाग झोपला आहे का? दूध संस्था व खाजगी दूध संस्थात मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होत असल्याचा आरोप  शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या उद्रेकास येणाऱ्या काळात सरकारला जाब द्यावा लागेल.

यावेळी यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जुन मोहिते, उपतालुका प्रमुख यशवंत जाधव, माजी संपर्कप्रमुख महिपत नाना डंगारे, विभागप्रमुख एम. पी. कदम, वर्धनगड शाखा प्रमुख घोरपडे, रिपब्लिकन पार्टीचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत शिवशरण, विभाग प्रमुख सुरज वाघ, उपतालुका प्रमुख आमीन आगा, अजित पाटेकर, निखिल राऊत, विश्वास नलवडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी दूध उत्पादक उपस्थित होते. पुसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष कांबळे बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर दूध ओतून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. दोन दिवसाच्या आत निर्णय घ्या अन्यथा दूध वाहतूक थांबवणार असा इशारा दिला.

दूधाला 40 रूपये दर देण्याची मागणी
काही दिवसापूर्वी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अहमदनगर जिल्ह्यात दूध दरासाठी उपोषण करण्यात आले होते. यावेळी मंत्री विखे यांनी किमान 34 दर देण्याचा निर्णय झाला असून त्यांची अमंलबजावणी न करणाऱ्या सरकारी दूध संस्था आणि खासगी संस्था यांचे परवाने रद्द करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. तर आज सातारा जिल्ह्यातील वर्धनगड येथे ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या रास्तारोकोवेळी सरकारने प्रति लिटर 40 रुपये दूधाला दर द्यावा, अशी मागणी केली आहे. सरकारने अधिवेशनात दूध दराची दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker