नवा विक्रम : कृष्णा कारखान्याचा 47 दिवसांत 5 लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण
शिवनगर | येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ या गळीत हंगामात आजअखेर ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. या हंगामात कृष्णा कारखान्याने योग्य नियोजनातून अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच केवळ ४७ दिवसांत ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करुन, कारखान्याच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ६४ वा गळीत हंगाम चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कारखान्याने यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी अवघ्या ४ महिन्यात कारखान्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण केले. यामुळे कारखान्याची क्षमता वाढून ती प्रतिदिन १२,००० मेट्रीक टन झाली आहे. याच महिन्यात ६ डिसेंबर रोजी कारखान्याने गाळप क्षमतेहून जास्त गाळप करत १२,४५० मेट्रीक टन उच्चांकी गाळपाचा टप्पा पूर्ण केला. याच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत, कारखान्याने आजअखेर ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करुन, नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, आसवणी आणि इथेनॉल प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सामान्य शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेऊन कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. याबद्दल शेतकरी सभासदांतून समाधान व्यक्त केले जात आहे.