आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेत गाैप्यस्फोट… शंभूराज देसाई 2004 साली शिवसेना पक्षातून बाहेर पडले
पाटण | शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील तळमावले (जि. सातारा) येथे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी एक गाैप्यस्फोट केला असून 2004 साली शिवसेना पक्षात झालेल्या भूकंपातही पक्षातून बाहेर पडणारे नेते हे पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई असल्याचे सांगितले आहे.
तळमावले (ता. पाटण) येथील जाहीर सभेला माजी मंत्री आदित्य ठाकरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे- पाटील, सचिन आचरे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षद कदम म्हणाले, 2019 मध्ये उध्दव ठाकरे यांनी एक महाविकास आघाडीचा प्रयोग केला. यामध्ये पाटण तालुक्यात लहान मूल जन्माला आलं, ते मूल (शंभूराज देसाई यांचा लहान मूल म्हणून उल्लेख) सतत रडत आहे. शंभूराज देसाईंनी 1997 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थित सत्तेत असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. चारवेळा पराभव पाहिल्यानंतर पहिला गुलाल उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून त्याच्यावर पडला, त्याचा विसर त्यांना पडला आहे. त्यांना पक्षाने सहकार परिषदेचा लाल दिवा दिला. 2004 मध्ये शिवसेना पक्षात पहिल्यांदा एक भूकंप झाला, त्यावेळीसुध्दा पक्षातून बाहेर जाणारे पहिले शंभूराज देसाईंच होते. परंतु, पुन्हा पक्षात आले. 1997 पासून सलग 26 वर्षे पाटण तालुक्यात एकही निवडणूक शिवसेना पक्षाच्या चिन्हावर लढली नाही, केवळ स्वतःचा गट निर्माण केल्याचा आरोपही केला आहे.
घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही
ठाकरेंच्या घराणेशाहीवर शंभूराज देसाई नेहमी बोलत असतात, याचाही हर्षद कदम यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, शंभूराज देसाई यांचे बंधू शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत. तर मुलगा कारखान्याचा चेअरमन आहे. तेव्हा तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सामान्य कार्यकर्ता शिक्षण संस्था, कारखाना येथे चेअरमन करताना दिसला नाही का?