उदयनराजेंचा इरादा पक्का : लोकसभा पिंजून काढण्यास सुरूवात
वैभव बोडके | सातारा प्रतिनिधी
साताऱ्यात लोकसभा निवडणूकीला जागा कुणाला मिळणार, कोण लढणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नसले तरी भाजपाचे राज्यसभा खासदार पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या इराद्याने मतदार संघात फिरू लागले आहेत. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून सातारच्या लोकसभा जागेवर दावा केला जावू लागला आहे. परंतु, या घडामोडी घडत असताना खा. छ. उदयनराजे यांनी भाजपाकडूनच लोकसभेचा इरादा पक्का केलेला दिसत असल्याने मतदार संघ पिंजून काढण्यास सुरूवात झाली आहे.
सातारा लोकसभा मतदार संघात सातारा- जावली, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, कोरेगाव, खटाव विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या विधानसभा मतदार संघात भाजप आणि मित्रपक्षांची ताकद मोठी आहे. खा. छ. उदयनराजे भोसले यांचे पक्षविरहीत असे काही विश्वासू कार्यकर्ते आहेत. ज्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होवू शकतो. तसेच खा. उदयनराजे यांची भूमिका हीच विजय पक्का किंवा धक्का देणारी ठरत असते. त्यामुळे भाजपही छ. उदयनराजे भोसले यांच्या नावावरच शिक्का मोर्तब करू शकते यांचा अंदाज आल्यानेच छत्रपती बाहेर पडल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
दोन्ही राजे भाजपात असल्याने सातारा- जावली मतदार संघावर वर्चस्व भाजपाचेच आहे. कोरेगाव मतदार संघात आ. महेश शिंदे आणि आ. शशिकांत शिंदे यांच्यात मतांची विभागणी होणार असली तरी छ. उदयनराजे भोसले यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. कराड उत्तर मतदार संघात आ. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपाने मोठी ताकद एकत्रित करण्यासाठीच धैर्यशील कदमांना काॅंग्रेसमधून भाजपात घेत जिल्हाध्यक्ष पद दिले आहे. मनोज घोरपडे यांची ताकद पहिल्यापासून छ. उदयनराजे आणि भाजपाच्या पाठिमागे आहे. कराड दक्षिणेत भाजपाचे लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले यांचीही मतांची मोठी ताकद आहे. तर पाटण मतदार संघात पालकमंत्री शंभूराज देसाई हेही छ. उदयनराजेंना मदत करून शकतात. या सर्व राजकीय गणितांचा विचार करून भाजप उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. सध्या निवडणूका जाहीर न झाल्याने वेट अॅण्ड वाॅचच्या भूमिकेत भाजपा असली तरी उमेदवार पक्का समजला जावू लागला आहे.
दिल्ली वारीनंतर मतदार संघात छ. उदयनराजे अॅक्टिव्ह
छ. उदयनराजे भोसले यांनी वर्षाअखेरीस दिल्लीवारी केली. यावेळी अनेक प्रश्नासंदर्भात मंत्र्यांना निवेदन दिली. अनेकांच्या भेटीगाठीही घेतल्या. छ. उदयनराजे हे सातारा शहराच्या दृष्टीने नेहमीच अग्रेसर असल्याचे पहायला मिळते. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर आल्याने आणि दिल्लीवारी झाल्यापासून मतदार संघातील पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर दिसत आहेत. त्यामुळे दिल्लीतून नक्की छ. उदयनराजेंना नक्की कोणता ग्रीन सिग्नल मिळाला असावा, जेणेकरून ते सध्या लोकसभा मतदार संघात अॅक्टिव्ह झाले आहेत.