टेंभूत कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे धडे

कराड | टेंभू (ता. कराड) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुकच्या कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती व जीवामृत बनवण्याची पद्धत व त्याचे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
शेती करताना सेंद्रीय शेती व जैविक शेतीचे महत्व व त्याचे होणारे फायदे कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. सेंद्रिय शेतीमध्ये मातीचे आरोग्य, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. मातीची धूप कमी होते, जलप्रदूषण होत नाही. तसेच शेतीला फायदेशीर असणारे कीटक आणि वन्यजीवांचे नुकसान कमी होते.
सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेले अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी होतो. सेंद्रिय उत्पादने ही आरोग्यदायी व सुरक्षित मानली जातात. सेंद्रिय शेतीमुळे पाण्याची गुणवत्ता चांगली राहते. त्यामुळे मानवाचे आरोग्य जोपासले जाते. शिवाय जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते. शेतातील उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. जैविक शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारेल. तसेच रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती, जैविक शेतीकडे वळावे असेही आवाहन यावेळी कृषीकन्यांनी केले.
यावेळी भिमराव पाटील, निवासराव बाबर, पंकज पाटील, बाळकृष्ण बाबर, दिलीप बाबर, रामचंद्र सावंत, विजय शिंदे, जयप्रकाश गुरव, स्वप्निल भुसारी, सदाशिव इंगवले, बबन भंडलकर, राजाराम बाबर, अनिता नलवडे, मनिषा सन्मुख, सिंधुताई यादव आदी शेतकरी उपस्थित होते.
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुकच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थीनी टेंभू येथे दाखल झाल्या आहेत. प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, प्राध्यापक दिपक भिलवडे, प्रा. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या शुभांगी सानप, यास्मीन मुलाणी, नम्रता पिचड, वृषाली रूपनवर, स्नेहल थोरात, लिशा वसावे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून दिले.



