साताऱ्यातून ”तुतारी” फुंकण्यासाठी जिल्हाध्यक्ष सज्ज ः तिघांच्यात रस्सीखेच
सातारा | सातारा लोकसभेला महायुतीत कोणता पक्ष खासदारकी लढणार हे निश्चित झाले नसले तरी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गट लढणार हे पक्क आहे. महायुतीतून पक्ष ठरला नसला तरी उमेदवारांनी तयारी सुरू केली तशी महाविकास आघाडीतून पवार गटानेही लोकसभा मतदार संघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी फुंकण्यासाठी माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांचे विश्वासू जिल्हाध्यक्ष सुनिल माने तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत पवार गटातूनच तिघांच्यात रस्सीखेच पहायला मिळत आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवार महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे नांव पुन्हा आघाडीवर आहे. मात्र, नवा चेहरा द्यायचा झाल्यास खासदार पुत्र सारंग पाटील आणि जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी लोकसभा मतदार संघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. तिघेही उमेदवार शरदचंद्र पवार गटाचे असून उमेदवारी मिळवण्यात नक्की कोण बाजी मारणार हे आगामी रणनितीवर ठरणार आहे. कराड विभागातून उमेदवार द्यायचा झाल्यास सारंग पाटील अन् विद्यमान खासदार यांचा विचार होवू शकतो. तर सातारा विभागातून उमेदवार म्हणून सुनिल माने यांचा विचार होवू शकतो. लोकसभेला नवा चेहरा म्हणून जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांना पसंती मिळू शकण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने तुतारी फुंकण्यास सज्ज झाले आहेत.
कोरेगाव आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघाशी थेट संपर्क जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांचा आहे. गेल्या 10 वर्षापासून ते पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. रहिमतपूर नगरपरिषदेवर त्यांचा एकहाती झेंडा राहिलेला अनेकदा पहायला मिळाला आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या 2009 च्या निवडणुकीपासून विजयात महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. अनेकदा इतर पक्षातून सुनिल मानेंना पक्षप्रवेशांच्या चर्चा झाल्या असल्या तरी ते आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी फूटीनंतर अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष ठाम राहिले आहेत. आ. बाळासाहेब पाटील यांचा गट सातारा जिल्ह्यात नेहमीच वरचढ राहिला असून 2019 सालच्या पोटनिवडणूक असो निवडणूक सर्वाधिक मतांचे लीड याच कराड उत्तरने दिले आहे. सातारा विभागासह कराड उत्तर आणि कोरेगावातून सुनिल माने यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांहस पदाधिकारी आग्रही असल्याचे दिसत आहे.