आजी- माजी पालकमंत्री आमनेसामने : सह्याद्रीचा ऊस नेण्यास देसाई कारखान्याला विरोध
मसूर – राज्य शासनाने सह्याद्रि कारखान्यास मंजूर केलेले कार्यक्षेत्र व दहा गांवामध्ये ऊस वाढीसाठी केलेल्या पाणी पुरवठा योजना व वाढीव ऊस गाळप क्षमतेस हक्काच्या कार्यक्षेत्रामधील ऊसाची आवश्यकता असल्याने, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला सह्याद्रिच्या कार्यक्षेत्रामधील कराड तालुक्यामधील एकूण १० गांवे समावेश करून घेण्यास सह्याद्रि साखर कारखान्याचा विरोध राहील, असे कारखान्याचे अध्यक्ष व आमदार बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखाना कार्यस्थळावर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यामुळे आता पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील हे ऊसाच्या मुद्यावरून समोरासमोर पहायला मिळणार आहेत.
कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय पी. डी. पाटील यांनी कारखाना ऊसाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण व्हावा; भविष्यात कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये होणारी वाढ विचारात घेवून, कारखाना कार्यक्षेत्रामधून बारमाही वाहणाऱ्या कोयना व कृष्णा नद्यावर कारखाना पुरस्कृत मोठ्या १६ जलसिंचन योजना कार्यान्वित केल्या. कोयना नदीवरील १) साजुरेश्वर सहकारी पाणी पुरवठा संस्था, साजूर, २) श्री नाईकबा सहकारी पाणी पुरवठा संस्था बेलदरे, म्होप्रे, भोळेवाडी ३) भाग्यलक्ष्मी सहकारी पाणी पुरवठा संस्था, आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडी, ४) चंद्रसेन सहकारी पाणी पुरवठा संस्था, वसंतगड, अबईचीवाडी, साकुर्डी आणि ५) एकेश्वरी सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित तांबवे या योजनांद्वारे वर नमूद केलेली गांवे बागायत करण्यात आलेली आहेत.
सदर गांवामधून आमचे सह्याद्रि कारखान्यास एकूण १७२१ सभासद आहेत. या गांवातील क्षेत्र बागायती करण्याबरोबरच ऊस उत्पादकांना मागणीनुसार खते, बी- बियाणे या सारख्या पायाभूत सुविधा देण्याचे काम त्याचबरोबर वेळोवेळी शेतकरी पिक परिसंवाद, चर्चासत्रे व तांत्रिक मार्गदर्शन करणेचे काम आमचा सह्याद्रि कारखाना करीत असतो. सभासद शेतकऱ्यांच्या मागणीवरून सह्याद्रि कारखान्याने प्रतिदिन ७५०० मे. टनावरून प्रतिदिन ११००० मे.टन ऊस गाळप क्षमता विस्तारवाढीच्या प्रकल्पाची उभारणी केलेली असून तो कार्यान्वित झाल्यानंतर वाढीव गाळप क्षमतेने गळीत करण्यात येणार आहे.
देसाई कारखान्याच्या सभेकडे शेतकऱ्यांचे लक्ष
कारखान्याचे कार्यक्षेत्र एकूण ५ तालुक्यामधील १९१ गावांचा समावेश आहे. पैकी कराड तालुक्यामधील १) सुपने, २) अबईचीवाडी, ३) पाडळी केसे, ४) तांबवे, ५) म्होत्रे, ६) साकुर्डी, ७) वस्ती साकुर्डी ८) केसे, ९) साजूर, १०) वसंतगड आदि सह्याद्रि साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधील गांवे बेकायदेशीररित्या घेण्याचा विषय लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर यांनी त्यांच्या दिनांक ३१/०८/२०२४ रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे घेतल्याचे त्यांचा वार्षिक अहवाल पाहिलेनंतर आमच्या प्रशासनाचे लक्षात आले आहे. या कृतीस आमचे सह्याद्रि सह. साखर कारखान्याची हरकत आहे. असे आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.