कराड दक्षिणेतील लोकांसाठी पृथ्वीराज चव्हाणांचे व्हिजन काय?
रयत संघटना काल, आज आणि उद्याही राष्ट्रीय विचार धारेसोबत : अॅड. उदयसिंह पाटील

कराड :- माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पावणेचार वर्षाच्या काळात कराड दक्षिणमध्ये जवळजवळ 1600 कोटीची विकासकामे केली. उंडाळे, मसूरकडे, ढेबेवाडी, पाटण आणि अोगलेवाडीकडे जाणारे रस्ते राज्य महामार्गापेक्षा चांगल्या दर्जाचे रस्ते झाल्याने रिअल ईस्टेट वाढली आहे. आता शिक्षण, हाॅस्पिटलला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटे लागत आहे. कराड दक्षिणेतील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढला आहे आणि हेच माझे व्हिजन असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कराड दक्षिण मतदार संघातील मुंबई रहिवाशी स्नेहमेळाव्यात आ. चव्हाण बोलत होते. यावेळी उल्हासदादा पवार, माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील, आ. भाई जगताप, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष श्री. काैशिक, मनोहर शिंदे, धनाजी काटकर, पुरूषोत्तम माने, अजित पाटील- चिखलीकर यांच्यासह कराड दक्षिणेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण मतदार संघान कधीही फुले- शाहू- आंबेडकराचा, समतेचा विचार सोडला नाही. यशवंतराव मोहिते भाऊ असतील, विलासकाका असतील त्यानंतर मी तुमच्या आशिर्वादाने काम करण्याची संधी दिली. 1991 साली अचानक राजीव गांधी यांनी मला खासदारकीचं तिकिट दिलं. त्यांना एक नवीन आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन असणारी युवकांची टीम पाहिजे होती, त्यामुळे त्यांनी मला कराड लोकसभेचं तिकिट दिलं. तुम्ही मला पदरात घेतलं. माझ्यावर विश्वास टाकला. तुमच्यामुळे 1991, 1996 साली मला काम करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या ध्यानीमनी नसताना अचानक रात्री 3 वाजता सोनिया गांधी यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं उद्या तुम्हांला मुंबईला जावून मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आहे.
अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकराचं जोरदार भाषण
स्व. बाबूराव शेटे जे मुंबईचे महापाैर, माथाडी कामगार नेते आण्णासाहेब पाटील यांनी येथील कष्टकरी जनतेला शासनाच्या दरबारात एक स्थान देण्याचा प्रयत्न केला. काॅंग्रेसची विचारसणीमुळे माथाडी कामगार कायदा लागू झाला. 1980 नंतर काकांनी याठिकाणी पुन्हा एकदा एकत्रित करून संघटना केली. जी अलिखित, घटना, अध्यक्ष नाही ती संघटना रयत संघटना आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी संघटना महत्वाची आहे. रयत संघटनेची धार काल, आज आणि उद्याही राष्ट्रीय विचार धारेसोबत राहणार आहे. आमचे वैचारिक मतभेद होते म्हणजे आम्ही एकमेकांचे दुश्मन आहोत, असे नाही. ज्या विचारधारेवर काका काम करत होते, त्याच विचारधारेवर बाबाही काम करत आहेत. काकाचं शेवटच्या भाषणात सांगितले होते, माझे वैचारिक मतभेद होते. कराड दक्षिणमधील नागरिकांना विनंती आहे, कोणत्याही अमिषांना बळी पडू नका.
कृष्णा कारखान्याचा ऊसाचा प्रश्न निकाली निघणार
विलासकाकांच्या दूरदृष्टीने नदीजोड प्रकल्प राबविण्यात आला. कराड दक्षिणेत मागेल तिथे विकासकामे झाली. पुन्हा काॅंग्रेसचा काळ येणार असून मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. रेठऱ्याचा पूलाचे काम सुरू आहे. त्यामुळे कृष्णा कारखान्याला वळसा घालून ऊस न्यायला लागायचा, तो आता वळसा घालावा लागणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान बंद होवून ऊसाचा प्रश्न लवकरच कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. कराडची शांतता प्रस्थापित करून भरभराट करण्याची गरज असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्राची गेली 10 वर्षे ‘लाॅस- द- डिकेड’ – पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्राच्या भवितव्याची गेली 10 वर्षे ही ‘लाॅस- द- डिकेड’ (lost decade) म्हणजे हरवलेलं दशक अशी आहेत. महाविकास आघाडीला 2-3 वर्षे मिळाली पण त्यावेळी कोव्हिडचा काळ होता. आपण त्यावेळी लोकांचे जीव वाचवले. मी हरवलेलं दशक का म्हणतो, कारण एकही उद्योग गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात आलेला नाही. अॅपल कंपनीचा लोकप्रिय फोन आहे, तो फोन तळेगावला करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ती कंपनी आली नाही, त्यानंतर चार कंपन्यांना कंत्राट दिले. त्यापैकी एकही कंपनी महाराष्ट्रात नाही. सेमीकंटक्टर कंपनीचा उद्योग गुजरात, तामिळनाडूत गेला. आैषधाचा कारखाना रायगडला येणार होता, तो नाही आला. लढाऊ विमान इंजिनचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, तो तेलगंणाला गेला. कंपन्यांना मी विचारलं का प्रकल्प येत नाहीत. याचं कारण आपल्या राज्यात भ्रष्टाचाराचं वातावरण आणि राजकीय अस्थिरता असल्याने प्रकल्प येत नाही. महाराष्ट्र एकेकाळी प्रथम क्रमाकांच राज्य होत. भारतीय अर्थव्यवस्थेला अोढून नेणार राज्य म्हटल जायचं. आता आपल्या राज्याचं दरडोई उत्पन्न 17 व्या स्थानावर आहे. सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी, शेतकऱ्यांनी, महागाईमुळे महिलांनी मोदी सरकार घालवलं. मोदी सरकारकडे पगार आणि पेन्शनसाठी पैसे नसल्याचेही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.