आगामी निवडणुकात एकसंघपणे आघाडीसाठी काम करा : आ. बाळासाहेब पाटील
कराड येथे लोकशाही आघाडीचा स्नेहमेळावा उत्साहात
कराड- सध्याच्या सरकारची सत्तेच्या जोरावर निवडणूका पुढे ढकलण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. सरकारने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेतल्या नाहीत. त्यामुळे शहरांचा विकास थांबला आहे. विधानसभेच्या निवडणूकीनंतर शासनास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्याव्या लागतील. वॉर्ड रचना, आरक्षण व वॉर्ड किंवा प्रभाग यावर चर्चा होऊन निवडणूका लागतील. या निवडणूकीस आपण सर्वांनी लोकशाही आघाडीच्या माध्यमातून सामोरे जायचे आहे. आगामी निवडणूकीसाठी सर्वांनी एकसंघपणे आघाडीसाठी काम करावे, असे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
कराड लोकशाही आघाडीचे सभासद, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा स्नेह मेळावा उत्सव लॉन, कराड येथे पार पडला. यावेळी आघाडीचे अध्यक्ष जयवंत पाटील, डॉ. अशोकराव गुजर, चंद्रकांत हिंगमिरे, संभाजीराव सुर्वे, आबा भोजगावकर, उमा हिंगमिरे, ॲड. विद्याराणी साळुंखे, बाबासाहेब भोसले, दाऊद सुतार, शिवाजीराव कदम, सौरभ पाटील, सुहास पवार, शिवाजी पवार, शहाजी डुबल, शशिकांत पोळ, कांतीलाल जैन, राजेश मेहता, अनिता पवार, पल्लवी पवार, सुनंदा शिंदे, श्रीमती अरुणा जाधव, मोहसिन आंबेकरी, प्रविण पवार, राहुल खराडे,ॲड. सतिश पाटील, गंगाधर जाधव, अमृत देशपांडे, जयप्रकाश रसाळ, शामराव शिंगण आदि मान्यवर कार्यकर्ते बंधु-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
सामाजिक कार्यकर्ते नाना खामकर, मिलींद कांबळे, सचिन चव्हाण, पोपटराव साळुंखे, शिवाजी पवार, आशा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आगामी सर्व निवडणूकीसाठी आम्ही आमदार बाळासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार काम करीत राहू व आमदार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी खात्री दिली. सूत्रसंचालन ॲड. प्रताप पाटील यांनी केले. आभार आघाडीच्या उपाध्यक्षा ॲड. विद्याराणी साळुंखे यांनी मानले.
नगरपालिकेच्या तयारीस लागा – सुभाषराव पाटील
माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील म्हणाले की, आजचा मेळावा हा कराड नगरपरिषदेच्या अनुषंगाने आयोजित केला आहे. चांगल्या विधायक विचाराचे नगरसेवक पालिकेत निवडून यावेत, अशी लोकशाही आघाडीची धारणा आहे. तरी आपण सर्वांनी विधानसभेनंतर होणा-या नगरपालिकेच्या निवडणूकीच्या दृष्टीकोनातून तयारीस लागावे.