कराड उत्तरेत महायुतीतून मनोज घोरपडे की रामकृष्ण वेताळ?
पक्ष बदलणारा नेता म्हणतो... कार्यकर्त्यांनो मागणी करा

(विशाल वामनराव पाटील)
सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाकडून तीन उमेदवारांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली. अजून हक्काचा मतदार संघ असलेल्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात महायुतीने उमेदवारी जाहीर केली नाही. याठिकाणी भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या युवानेते मनोज घोरपडे की किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ या दोघांपैकी कोणाची वर्णी लागणार हे दुसऱ्या यादीत नक्की होणार आहे. राजकीय स्वार्थापोटी पक्ष बदलणाऱ्यांना भाजपाच्या वरिष्ठांनी ठेंगा दाखवल्याची माहिती मिळत आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघ चार तालुक्यात विभागात असल्याने येथील मतदारांची वेगवेगळी मते दिसून येतात. या मतदार संघाचा अंदाज बांधणे राजकीय जाणकारांनाही कठीण असते. महाविकास आघाडीतून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचे तिकिट फायनल असल्याने महायुतीतून अनेक नावांची चर्चा होत होती. या नावातून आता अंतिम दोन नावावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून भाजपाच्या दुसऱ्या यादीत मनोज घोरपडे आणि भाजपा किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघाची 2009 साली पुर्नरचना झाली असून तेव्हापासून मनोज घोरपडे आणि रामकृष्ण वेताळ हे दोघे भाजपाशी एकनिष्ठ आहेत. दोघांनाही पक्ष वाढीसाठी मोठे कष्ट घेतले आहेत. मधल्या काळात शिवसेना- भाजप युतीधर्मात शिवसेनेला जागा गेली तरी मनोज घोरपडे यांनी भाजपाचा विचार सोडला नाही. रामकृष्ण वेताळ यांनी कराड उत्तरमध्ये पक्षाचे कार्यकर्ते वाढविण्यासाठी तसेच ऐनवेळी पक्षाने दिलेली जबाबदारी पाडण्यासाठी जीवाचे रान केले आहे. त्यामुळे आता मनोज घोरपडे की रामकृष्ण वेताळ या दोन नावापैकी कोणाची वर्णी कराड उत्तर विधानसभेचा उमेदवार लागणार याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.
पक्ष बदलणारा नेता म्हणतो… कार्यकर्त्यांनो मागणी करा
कराड उत्तरेतील वातावरण निवडणुसाठी पक्षासाठी चांगले असल्याने भारतीय जनता पक्ष निष्ठावंताला संधी देणार आहे. याबाबत पक्षाने आपल्या नावावर फुली मारल्याने पक्ष बदलणारा नेता आता कार्यकर्त्यांना म्हणतोय. माझ्या उमेदवारीची मागणी करा, वरिष्ठांना निरोप धाडायचा आहे. मला उत्तरेतून लढण्यासाठी कार्यकर्ते मागणी करत आहेत. काॅंग्रेस, शिवसेना आणि आता भाजपात फिरत- फिरत निष्ठा फिरवणारा मी असलो तरी मला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा नेता बाळगून आहे.