कोपर्डे हवेलीत शेतात अग्नी तांडव…100 एकरातील ऊस जळून खाक

कोपर्डे हवेली : – कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील डिक्कन पांद शिवारातील सुमारे शंभर एकर क्षेत्रातील ऊस दुपारी एकच्या सुमारास जळून खाक झाला. आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, डिक्कन पांद शिवारात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. भर दुपारी एकच्या सुमारास ऊसाला आग लागल्याचे समजताच सुनिल चव्हाण, विक्रम चव्हाण, अरुण चव्हाण यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी डिक्कन पांद शिवाराच्या दिशेने धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आगीच्या ज्वाळा मोठ्या असल्याने तसेच उन्हाच्या तडाखा आणि वाऱ्याच्या प्रवाहामुळे आग आटोक्यात आणण्यात शेतकऱ्यांना अपयश आले. आगीत अनेक शेतकऱ्यांचे ठिबक संच, पाईप जळून मोठे नुकसान झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केले असताना शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला परंतु शिवारातील सर्व क्षेत्र अगीत जळून खाक झाले.
ऊस जळालेल्या शेतकऱ्यांमध्ये अलंकार चव्हाण, हणमंत चव्हाण, त्रिंबक चव्हाण, उत्तम चव्हाण, मोहन चव्हाण, राजेंद्र चव्हाण, कुंडलिक चव्हाण, संतोष चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, जिजाबा चव्हाण, सचिन चव्हाण, रवी चव्हाण, महादेव चव्हाण, तुकाराम चव्हाण, सतीश चव्हाण, विठ्ठल पवार, आनंदराव चव्हाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा सामावेश आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.