ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक : सातारा आणि सांगली जिल्ह्यात ऊस वाहतूक रोखली

कराड | पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आता व्यापक स्वरूप घेतले असून सहकारी आणि खाजगी साखर कारखानदारांची मुजोरी रोखण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संघटनेने आंदोलन करत सुमारे 60 ते 70 ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली. बळीराजा आणि स्वाभिमानी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाने दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे धाबे अक्षरशः दणाणले आहेत. जोपर्यंत ऊस दर मिळत नाही, तोपर्यंत उसाची वाहतूक करू नका, अन्यथा वाहनाच्या चाकातील हवा सोडली जाईल, असा कडक इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी संघटना ऊस दरासाठी आक्रमक झाल्या आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, साखर आयुक्त, जिल्हाधिकारी व साखर कारखानदार एकाही शेतकरी संघटनेला विश्वासात न घेता कामकाज करत असून गळीत हंगाम मोठ्या जोमाने सुरू केला आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका बळीराजा शेतकरी संघटनेने घेतली आहे. सातारा जिल्ह्यात ही संघटना आक्रमक झाली असून सातारा व सांगली रस्त्यावर उसाने भरलेले ट्रॅक्टर रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास अडविले. ऊस दर आंदोलन सुरू असताना वाहतूक का करता ? असा सवाल करत त्यांनी सुमारे 60 ते 70 वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली. यापुढे अशा पद्धतीने आंदोलन सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.
कराड -कासेगाव परिसर, पाटण -कराड रस्ता, मलकापूर, तासवडे टोल नाका, मल्हारपेठ, निसरे फाटा, तांबवे फाटा, पाटण रस्ता- वारूंजी फाटा परिसरात आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले असून रविवारी रात्री देखील मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सकाळी अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून साखर कारखाना प्रशासन काय भूमिका घेणार याकडे संघटना तसेच शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.