कराड- कोरेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या खिंडीत दरड कोसळली

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कराड व कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या वाठार किरोली खिंडीत दरड कोसळल्याने दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने जीवित हानी झाली नाही. सुरुवातीला काही नागरिकांनी एका बाजूने दुचाकीसाठी रस्ता मोकळा केला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात डोंगराचा भाग रस्त्यावर पडल्याने वाहतूक दोन तास ठप्प होती.
सातारा जिल्ह्यातील कराड व कोरेगाव तालुक्याला जोडणारी वाठारखिंड पाडळी ते वाठार दरम्यान रस्त्यावर आहे. काही वर्षांपूर्वी या खिंडीतला रस्ता मोठ्या उंचावर होता. तो चढ कमी करण्याचे काम करण्यात आले होते. पश्चिमेकडील बाजूला डोंगराचा भाग असल्याने हा भाग गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे ढिसूळ झाला होता. या खिंडीतल्या रस्त्याचा भाग काल दुपारी रस्त्यावर पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यामुळे कराड कोरेगाव मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती.
या मार्गावर सुरुवातीला काही प्रवाशांनी एका बाजूने दुचाकी जाईल. एवढा रस्ता सुरू करून मार्ग मोकळा केला. मात्र दगड व मुरमाचा मोठा ढिगारा रस्त्यावर पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. दरम्यान वाठार किरोलीच्या विकास गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने पडलेले दगड व मुरूम हलवल्यानंतर रस्ता पूर्ववत सुरू झाला. दरम्यान या खिंडीतील ठिसूळ झालेला डोंगराचा भाग काढून टाकावा, अशी मागणी परिसरातील वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे.