मसूर- हेळगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ : दुचाकी टार्गेट
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
हेळगाव (ता. कराड) परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. दहा दिवसापूर्वी चिंचणी येथील दुचाकी गाडी चोरीस गेलेली घटना ताजी असतानाच हेळगावला एक दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. तर दुसऱ्या दुचाकीचे चाक पंक्चर असल्याने दुचाकी चोरण्याचा चोरट्यांचा डाव फसला. दुचाकी चोरट्यांची टोळीच या विभागात सक्रिय झाल्याने खळबळ उडाली आहे.
हेळगाव नजीक असणाऱ्या पुनर्वसित चिंचणीच्या नवनाथ पवार यांची दुचाकी दहा दिवसांपूर्वी घरासमोरून चोरीस गेली होती. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर गाडी सातारा तालुक्यातील निसराळे फाट्यानजिक असणाऱ्या महामार्गावरील उड्डाण पुलाखाली आढळून आली. त्यामुळे त्यांना त्यांची गाडी परत मिळाली होती. मात्र त्यानंतर आठवड्याभरातच तारगाव फाटा परिसरातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली या आठवड्याभरातच संदीप वायदंडे यांची स्प्लेंडर दुचाकी चोरट्यानी लंपास केली. सदर चोरीची नोंद मसूर पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
पत्रकाराच्या गाडीचा चोरीचा प्रयत्न फसला
हेळगाव (ता. कराड) येथील शनिवारी रात्री एक दुचाकी चोरट्याने लंपास केली. त्याचवेळी नजीकच असणाऱ्या पत्रकार प्रदीप पाटील यांच्या दुचाकीचे हँडल लॉक काढून ती गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर दुचाकीचे मागील चाक पंक्चर असल्याने ती गाडी रस्त्याकडेला सोडून चोरट्यांनी पळ काढला.
सीसीटीव्ही नावाला… उपयोग नाही गावाला…
उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी केलेल्या आवाहनानुसार विविध गावात सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आले आहेत. मात्र, अनेक वेळा या सीसीटीव्हीची यंत्रणा कधी बिघाडामुळे तर कधी अन्य कारणामुळे बंद असते. सीसीटीव्ही यंत्रणा असूनही त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तर काहींनी सीसीटीव्ही नावाला उपयोग नाही गावाला अशी स्थिती पाहता सीसीटीव्हीची अवस्था झाली असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.