वनरक्षकाची बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेवून आत्महत्या

शिराळा | शिराळा येथील श्रीराम कॉलनीमध्ये चांदोली येथे वनरक्षक असणाऱ्या प्रमोद पांडुरंग कोळी (वय- 34, रा.सध्या श्रीराम कॉलनी, मुळगाव- बोरपाडळे, ता. पन्हाळा) यांनी बेडरुममध्ये पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत घर मालक दयानंद घोडके (वय- 50) यांनी पोलिसात माहिती दिली आहे.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद कोळी हे चांदोली- झोळंबी या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून वनरक्षक म्हणून नोकरीस होते. शिराळा येथील श्रीराम कॉलनीत गत पाच महिन्यांपासून पत्नी सोबत रहात होते. सोमवारी रात्री आठ नंतर प्रमोद हे त्यांचे बेडरुम मध्ये काम करत बसले होते. त्यामुळे त्यांची पत्नी प्रणाली या बाजूच्या खोलीत झोपल्या. मंगळवारी सकाळी आठ वाजता पत्नी ही पती प्रमोद यांना उठविण्यासाठी गेल्या असता बेडरूमला आतून कडी होती. बराच वेळ आवाज देवून कडी काढली नाही. त्यामुळे प्रणालीने घर मालक घोडके यांना माहिती दिली.
यावेळी शेजारी असणाऱ्या संदीप मुळे, मारुती माने, प्रकाश कांबळे, शंकर पाटील यांना बोलावून त्यांच्या मदतीने दरवाजा फोडुन आतील कडी काढली. आत जावुन पाहिले असता प्रमोदने बेडरुम मधील खोलीतील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. पुढील तपास हवालदार भाऊसाहेब कुंभार करत आहेत.