सातारा जिल्ह्यातील ए. के. टोळीतील 4 तरूणांवर मोक्का कारवाई
शिरवळ | शिरवळ परिसरात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या ए. के. टोळीतील आतिश कांबळे याच्यासह चार जणांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये टोळीप्रमुख आतिश ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे (वय- 21), विशाल शेखर वाडेकर (वय- 20), रामा दादा मंडलिक (वय- 20, तिघे रा. शिरवळ) व संजय विजय कोळी (वय- 20, रा.संभाजी चौक, खंडाळा) यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ पोलिस ठाण्यामध्ये या कारवाईमधील या संशयितांवर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील फिर्यादी हे आपल्या ओळखीचे मित्र यांच्याकडे उसणे दिलेले पैसे परत घेण्याकरिता चालत जाताना यातील संशयित आतिश ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे याने मोटारसायकलवरून कट मारला म्हणून फिर्यादी यांनी त्याला विचारणा केली असता आतिश ऊर्फ बाबू कांबळे याने शिवीगाळ करत तलवारीसारखे लोखंडी हत्याराने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासामध्ये टोळीप्रमुख आतिश ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, विशाल शेखर वाडेकर, रामा दादा मंडलिक व संजय विजय यांनी संघटितपणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांनी गुन्ह्यांची माहिती संकलित करत मोकाअंतर्गत कारवाईचा पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत कोल्हापूर महानिरीक्षक कार्यालयास पाठवला.
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांनुसार मोकाअंतर्गत कारवाईची मान्यता देत तपास फलटण पोलिस उपअधीक्षक राहुल घस यांच्याकडे सोपवला. या प्रस्तावाकरिता पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, शिरवळ पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, सतीश अंदेलवार, शंकर पांगारे, अमित सपकाळ, जितू शिंदे, सचिन वीर, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर यांनी परिश्रम घेतले.