शिकारीच्या फासणीत अडकल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू
पाटण तालुक्यातील आबदारवाडीत प्रकार

पाटण | आबदारवाडी (ता. पाटण) येथे शेतात रानडुकरांसाठी लावलेल्या शिकारीच्या फासणीत अडकून एका मादी बिबट्याचा दुर्देवी मृत्यु झाला. या प्रकराबाबत वन्यप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तारेची फासणी लावणाऱ्या अज्ञाताविरोधात वनविभागाने गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत मल्हारपेठ वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आबदारवाडी येथील धायटा नावाच्या शिवारातील एका मालकी क्षेत्रात साडेपाच ते सहा वर्ष वयाचा मादी बिबट्या खाण्याच्या शोधात असताना रानडुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या तारेच्या फासणीत मादी बिबट्या अडकला होता. या फासणीत बिबट्याच्या कमरेचा भाग अडकल्याने धडपडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
याविषयीची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, तालुका वनाधिकारी एल. व्ही. पोतदार, मल्हारपेठचे वनपाल संजय भाटे व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळासह परिसराची पहाणी केली असता, त्यांना बिबट्याची पिल्ले आढळून आली नाहीत. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तारेची फासणी लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात वनविभागाने गुन्हा नोंदवला असून वनविभागाकडून संबंधित शिकाऱ्यांचा शोध सुरु आहे.
 
					 
					 
					 
					



 
					