कराड- चिपळूण महामार्गावर बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार
कराड | कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यात आज (रविवारी) पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. कराड व पाटण तालुक्यात दिवसेंन दिवस बिबट्याची संख्या वाढत असून आता मानवी वस्तीतही त्यांचा शिरकाव वाढलेला आहे. त्यामुळे रात्री- अपरात्री मुख्य मार्गावर बिबट्या आल्याने वाहनांच्या धडकेत मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील नेचर गावच्या हद्दीत रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच वनविभागाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत पाहणी केली. धडक दिलेले वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून त्याबाबत अधिक माहिती वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्यास शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मृत बिबट्याचे केस, नखे हे सुखरूप असल्याचे संबधित वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बिबट्याच्या या मृत्यूमुळे नेचर तसेच परिसरातील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण आहे.