वाघेरी गावातून पिस्टल व 3 काडतुसे बाळगणाऱ्या एकाला अटक : सातारा एलसीबीची कारवाई
कराड | वाघेरी (ता. कराड) येथील एकाजवळ बेकायदा भारतीय बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती सातारा गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार वाघेरी गावात जावून 1 पिस्टल आणि 3 रिकामी काडतुसे असा 1 लाख 15 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय विष्णू बनसोडे (वय- 47 वर्षे, रा. वाघेरी, ता. कराड, जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस उपनिरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत वाघेरी येथील संजय बनसोडे यांच्याजवळ पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांचे पथकास दिली. तसेच संशयितास ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस पथकाने वाघेरी गावात जावून संजय बनसोडे यांची माहिती काढून त्यास ताब्यात घेतले. संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 पिस्टल व 3 रिकामी काडतुसे असा 5 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पतंग पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, अजित कर्णे, सनी आवटे, अर्जुन शिरतोडे, मनोज जाधव, शिवाजी भिसे, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, वैभव सावंत, संदिप कांबळे यांनी सदरची कारवाई केली आहे.