कराड- विटा मार्गावर हाॅटेल हर्षवर 10 ते 15 जणांच्या जमावाची दगडफेक
कराड । कराड- विटा मार्गावरील सैदापूर- विद्यानगर गावच्या हद्दीतील कृष्णा कॅनॉल एका हाॅटेलमध्ये उधारीवर दारू न दिल्याचा राग मनात धरून 10 ते 15 जणांच्या जमावाने हाॅटेलवर दगडफेक केली. रात्री उशिरा झालेल्या दगडफेकीच्या घटनेत हाॅटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली. या हल्ल्यानंतर कृष्णा कनाॅल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- विटा मार्गावरील हॉटेल हर्ष एक्झिक्युटिव्हमध्ये शनिवारी एका युवकाने दुपारी उधारीवर दारूची मागणी केली. त्यावेळी तेथील हॉटेल कर्मचाऱ्यांने उधारीवर दारू देण्यास नकार त्या युवकाला मारहाण करून तेथून हाकलून दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दुसरा एक युवक रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुमारे 10 ते 15 जणांचा जमाव घेऊन पुन्हा हॉटेल हर्ष एक्झिक्युटमध्ये गेला. तेथे त्याने उधारीवर दारू देण्याची मागणी केली. मात्र, हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी नकार देताच जमावाने हॉटेलवर हल्ला केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करत लाकडी दांडके, सायलेन्सर तसेच बाटल्यांनी हॉटेलची तोडफोड केली. यामध्ये हॉटेलच्या काचा फोडल्या असून इतर साहित्यासह फलकाचेही नुकसान केले आहे.हल्ला केल्यानंतर जमाव तेथून पांगला.
या घटनेची माहिती मिळताच कराड गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस उपनिरीक्षक चोरगे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच हल्ला केलेल्या जमावामध्ये कोण- कोण होतं याचीही माहिती घेण्यास सुरुवात केली असून या घटनेची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.