Karad : यात्रेतील भांडणांमुळे युवकावर कुऱ्हाडीने वार

कराड | यात्रेत मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून युवकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला. कराड तालुक्यातील अकाईचीवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी एकावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनोद विश्वास माने याने याबाबतची फिर्याद दिली. रघुनाथ तुकाराम चिखले असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अकाईचीवाडी येथील यात्रेमध्ये विनोद माने याचा गावातीलच रघुनाथ चिखले याच्या मुलाशी वाद झाला होता. या वादानंतर चिडून जाऊन रघुनाथ चिखले हा कुऱ्हाड घेऊन विनोदच्या घरासमोर आला. त्याने शिवीगाळ करीत तुला कुऱ्हाडीने तोडतोच, असे म्हणून विनोदवर वार केला. त्यामध्ये विनोदच्या हाताला गंभीर जखम झाली.
तसेच त्याच्या आई-वडिलांनाही रघुनाथ चिखले याने मारहाण केली. मारहाणीत कुऱ्हाडीच्या दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने आई- वडिलांना मुक्कामार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विनोद माने यांच्या मनगटावर जखम झाली असून याबाबतची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार ज्ञानेश्वर राजे तपास करतायत.