मसूर ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधा न दिल्यास 15 ऑगस्टला उपोषणास बसणार : पत्रकार परिषदेत इशारा

मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
मसूर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षीतपणामुळे 20 वर्षापासून सर्व प्रकारचे कर भरूनही मूलभूत सुविधां दिल्या जात नाहीत. वीज, पाणी, रस्ता नाही. कचऱ्यासाठी घंटागाडी नाही. रस्ता नसल्याने गॅस गाडी व मुलांसाठी स्कूल बसची सुविधा उपलब्ध होत नाही. रस्त्यात तळ्यासारखे पाणी साचल्याने वहिवाट बंद झाली आहे. एका व्यक्तीच्या हट्टापायी इतरांना वेठीस धरणे ही अन्यायकारक बाब असल्याचे इथल्या म्हाकुबाई वार्ड क्रमांक 6 मधील नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत आम्हाला न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्टला तहसीलदार व पंचायत समितीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा संतप्त महिला व नागरिकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.
अधिक माहिती देताना महिला म्हणाल्या कराड – मसूर रस्त्याच्या पूर्व बाजूला दत्तात्रय पाटोळे व जयवंत जगदाळे यांच्या कॉम्प्लेक्स मधील दहा फूट रस्ता ठरावानुसार बाळासाहेब कदम यांच्या घरापर्यंत 180 मीटर लांब असून 2014 ला हस्तांतरित आहे. ग्रामपंचायतीच्या 26 नंबरला रस्त्याची नोंद आहे. या परिसरातील नागरिकांनी जागा खरेदी करून वास्तव्य केले आहे. एकूण दहा खरेदीपत्रात दोन्ही बाजूकडील लोकांनी पाच पाच फूट असा दहा फुटाचा रस्ता कायदेशीर नोंद केला आहे. स्टॅम्पवरसुद्धा सर्वांच्या सहमतीच्या सह्या असताना हा रस्ता खाजगी करावा असा अर्ज एकाने केला. एका व्यक्तीच्या हट्टानुसार सदरचा रस्ता ग्रामपंचायतीने 29 /4 /2022 रोजी रद्द केला. त्यावेळी इतरांचे म्हणणे व त्यांच्या समस्या याबाबत मसूर ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले.याप्रकरणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना रस्त्याबाबत मूलभूत सुविधा मागितल्या प्रकरणी कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला. एकंदरीत मुस्कटदाबी सुरू आहे.
शासनाची जलजीवन मिशन योजना सुरू असून त्याची पाईपलाईन अडवली आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याचा लाभ मिळणार नाही. ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारचे कर वेळेवर भरून सुद्धा नागरिकांना मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. नाला बांधकाम नसल्याने नागरिकांना घरामध्ये शोष खड्ड्याचे शौचालय बांधावे लागले. ग्रामपंचायतमध्ये हेलपाटे मारून देखील पदाधिकारी दाद देत नसल्याचा आरोप संतप्त नागरिकासह महिलांनी केला. आता न्यायासाठी उपोषणास बसल्याशिवाय पर्याय नसल्याने 15 ऑगस्टला तहसीलदार व पंचायत समितीसमोर उपोषणास बसणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. रुक्मिणी गजानन धस, कुसुम उत्तम पाटोळे, बाळासाहेब आनंद कदम, सयाजी शंकर वाघमारे यांनी ग्रामपंचायत सर्व प्रकारचे कर भरूनही मूलभूत सुविधा देत नसल्याबाबतच्या तक्रारी मांडल्या असून उपोषणाचा इशारा दिला.



