घातपात की आत्महत्या? : पवारवाडीत मायलेकीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

फलटण | पवारवाडी (बटई, ता. फलटण) येथील मायलेकीचे मृतदेह त्यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शोभा तानाजी गावडे (वय- 45) आणि साक्षी तानाजी गावडे (वय- 14) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. दरम्यान, हा घातपात की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, पवारवाडी (बटई) हद्दीतील मायलेकीच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास शोभा गावडे यांचा मृतदेह आढळून आला. विहिरीतील सर्व पाणी काढल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास साक्षी गावडे हिचा मृतदेह विहिरीतील गाळात रुतलेला आढळून आला. सदर घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सहा वर्षापूर्वी शोभा गावडे यांच्या पतीचे अपघाती निधन झाले आहे. तर दोन मुलीचा विवाह झालेला असताना शोभा आणि साक्षी या मायलेकीचा मृतदेह आढळल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत. याबाबत फलट पोलिस अधिक तपास करत आहेत.



