सातारा जिल्ह्यात कारवाई : आईचा सांभाळ न करणाऱ्या मुलांसह सुनांना अटक

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
आईचा सांभाळ करत नसल्याप्रकरणी पिंपरे बुद्रुक (ता. खंडाळा) येथील फरारी दोन मुलांसह त्या दोघांच्याही बायका अशा चार जणांना लोणंद पोलिसांनी न्यायालयाच्या अटक वॉरंटनुसार पिंपरे बुद्रुक येथे अटक केली.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, पिंपरे बुद्रुक (ता. खंडाळा) येथील श्रीमती ताराबाई ज्ञानदेव शिंदे (वय- ७५) या विधवा व ज्येष्ठ महिला असून, त्यांना त्यांची दोन्ही मुले प्रताप ज्ञानदेव शिंदे, विजय ज्ञानदेव शिंदे तसेच सुना निर्मला प्रताप शिंदे, सुषमा विजय शिंदे (सर्व रा. पिंपरे बुद्रुक, ता. खंडाळा) हे त्यांचा सांभाळ करत नसल्याने त्या मुंबईत त्यांच्या मुलीकडे आश्रयाला आहेत. त्यांनी कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत विक्रोळी मुंबई येथील न्यायालयात 2019 मध्ये या चौघांविरुद्ध पोटगीचा दावा दाखल केला आहे. दरम्यान, हे चौघेही या दाव्यासंदर्भात न्यायालयात हजर होत नसल्याने न्यायालयाने या चौघांविरुद्ध वॉरंट काढल्यावर हे सर्वजण फरारी झाले होते. ते मिळून येत नव्हते. त्यांना फरारी घोषित करून त्यांच्याविरुद्ध जप्ती वारंट अटक वॉरंट काढले होते.
दरम्यान, यातील प्रताप ज्ञानदेव शिंदे, विजय ज्ञानदेव शिंदे हे त्यांच्या राहत्या घरी पिंपरे बुद्रुक (ता. खंडाळा) येथे आल्याची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले यांना मिळाली. त्यांनी पोलिस हवालदार धनाजी भिसे यांच्यासह पोलिस कर्मचारी पाठवून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्या पत्नी निर्मला व सुषमा शिंदे यांची माहिती काढून महिला पोलिसांमार्फत त्यांनाही नमूद वॉरंटमध्ये अटक केले. त्यानंतर त्यांना योग्य पोलिस बंदोबस्तात मुंबई विक्रोळी येथील न्यायालयात हजर करून प्रोक्लेमेशन वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, राहुल घस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले, सहायक पोलिस फौजदार रमेश वळवी, हवालदार धनाजी भिसे, योगेश कुंभार, नितीन भोसले, विठ्ठल काळे, अश्विनी माने, संजय चव्हाण आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.



