सातारा ACB ची कारवाई : तहसील कार्यालयातील लोकसेवक 55 हजारांची लाच घेताना सापडला
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणारे व्यवसायिकाच्या दोन डंपर जप्त केले होते ते डंपर सोडवण्यासाठी 55 हजार रुपयांची मागणी करून तिलाच स्वीकारताना वडूज तहसील कार्यालयातील एकाच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे कारवाई केली असून खटाव तालुक्यात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याबाबतची तक्रार एका 32 वर्षीय व्यक्तीने केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे मालकीचे दोन डंपर असून ते बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतात. यातील तक्रारदार यांचे दोन्ही डंपर दि.16/11/2023 रोजी क्रश सॅण्ड व क्रश खडी भरून वाहतूक करीत असताना तहसिलदार खटाव यांनी तक्रारदार यांचे दोन्ही डंपर जप्त केले होते. सदरचे दोन्ही डंपर सोडविण्यासाठी तहसिल कार्यालय खटाव येथील लोकसेवक प्रविण धर्मराज नांगरे, (वय -42 वर्ष, रा. मौजे तडवळे, ता. खटाव. जि. सातारा). पद – महसूल सहाय्यक, तहसिल कार्यालय, (वडूज) खटाव यांनी स्वतःसाठी तक्रारदार यांना डंपर सोडविणेकरीता 55,000/- रुपये लाच मागणी करून ती लाच रक्कम स्विकारल्यावर लोकसेवक नांगरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई अतिरिक्त कार्यभार, पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो. हवा. नितीन गोगावले, पो.ना. गणेश ताटे, पो. ना. निलेश राजपुरे, म. पो. ना. प्रियांका जाधव, पो. कॉ. निलेश येवले, पो. कॉ. तुषार भोसले, म. पो. कॉ. शितल सपकाळ यांनी केली.