कराडला पावणे नऊ लाखांच्या अवैध गुटख्यावर कारवाई : एकजण ताब्यात

कराड – शहरातील मेन बाजारपेठेत अवैध गुटखा, विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाल्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या एकास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे पावणेपाच लाख रूपये किमतीचा गुटखा व एक चारचाकी गाडी असा सुमारे पावणेनऊ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, डीबी पथकाचे गणेश कड व कर्मचाऱ्यांना अवैध गुटख्यावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कोंडीराम पाटील यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, भरत जैन हा अवैध गुटखा, विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाल्याची चोरटी वाहतूक करण्याच्या इराद्याने शुक्रवार पेठ येथे येणार आहे. त्या माहितीच्या आधारे डीबी पथकाचे गणेश कड, मोहसीन मोमीन, अनिल स्वामी, आनंदा जाधव, समीर पठाण, महेश पवार यांनी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ येथे छापा टाकला. यावेळी भरत जैन हा पोलिसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये सुमारे पावणेपाच लाख रूपये किमतीचा गुटखा विमल पान मसाला, रजनीगंधा पानमसाला व एक चार चाकी गाडी असा एकूण पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भरत मोहनलाल जैन (रा. शुक्रवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
सदरची कारवाई डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक पंतग पाटील, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अशोक वाडकर, अमित पवार, अनिल स्वामी, संदीप कुंभार, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, समीर पठाण, महेश पवार, अमोल देशमुख, मुकेश मोरे, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, हर्षद सुखदेव, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ, सपना साळुंखे यांनी केली.