स्वार्थ आला की बसून चर्चा, साप सोडायचा उद्योग : छ. उदयनराजेंना आमदारांचा टोला

सातारा | स्वतःचा स्वार्थ आला की बसून चर्चा करूया या गोष्टी समोर येतात, परंतु आम्हाला कुठलीही चर्चा करायची नाही. सातारा नगरपालिकेत 5 वर्षात काम शून्य अन् नुसता भ्रष्टाचार- टक्केवारी सातारकरांनी पाहिली आहे. आता स्वतःचा पराभव दिसायला लागला आहे, त्यामुळे नगरपालिका या गोष्टी कुठेतरी मिळाव्यात म्हणून साप सोडायचा उद्योग चालू असल्याचा टोला आमदार शिवेंद्रराजे यांनी खा. छ. उदयनराजे भोसले यांचे नांव न घेता लगावला.
काही दिवसांपूर्वी साताऱ्यात नव्याने होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेच्या वादावरून खा.उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे हे समोरा समोर आले होते. त्यावेळी उदयनराजेंनी या जागेत असणारे बाजार समितीचे कंटेनर ऑफिस पोकलेन मशीन च्या साह्याने फोडून टाकले होते. या बाबत अखेर सुप्रीम कोर्टाने उदयनराजेंच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळे या जागेत पहिल्यांदा बाजार समितीच्या वतीने बैल बाजार भरवण्यात आला होता. या बाजाराचे उद्घाटन आ. शिवेंद्रराजे यांनी केले आहे. या वेळी ते बोलत असताना त्यांनी खा. उदयनराजे यांच्या वर जोरदार टीका केली.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आम्हाला काम करायचे आहे. मार्केट यार्ड ही माझी वैयक्तिक नाही, मी कुठेही व्यवसाय करणार नाही. लायसन घेणार असं नाही. तेव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला पाहिजे. आमचा कंटेनर मोडून टाकला तो मोडून काय झालं. शेवटी सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला.
जिल्हा बॅंकेच्या युरोप दाैऱ्यावरूनही टोला
युरोप दौऱ्यावरून उदयनराजे भोसले म्हणाले होते. नेटवरून सर्व माहिती मिळते जायची, काय गरज नव्हती. यावर शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, स्वतः जिल्हा बँकेत निवडून आलेत. मात्र कधी मिटींगला येत नाहीत. त्याऐवजी एखादा काम करणारा संचालक बँकेत आला असता. केवळ ड्रायव्हरच्या पोराच्या बदलीसाठी जिल्हा बँकेत यायचं, अशा संचालकाचे बॅंकेत काय काम असा खोचक टोलाही छ. उदयनराजे भोसले यांना लगावला.



