अजित पवार आणि शरद पवारांचा राजकारणातील सर्वात मोठा गेम : आ. बच्चू कडू

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमचेच नेते असल्याचा म्हटल्यानंतर या प्रतिक्रियेवरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शरद पवार यांच्या विधानामुळे जनतेत संभ्रम होत असल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचा हा सर्वात मोठा गेम असू शकतो. तेव्हा राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची डोकं फुटायची वेळ येईल, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
बच्चू कडू हे कोल्हापुरात आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे थेट ऑलिम्पिकच असू शकेल. पवार काका पुतण्या हे लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं तसं इथं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. सगळ्यांचा संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
बाप मेल्याचं दुःख नाही, पण नेत्या मेल्याचं दुःख
राजकारणात भावाभावात विश्वास ठेवता येत नाही. आता शरद पवार यांचेच बघा ना? अजित पवार सत्तेत आहेत, शरद पवार विरोधात आहेत. माझी निष्ठा सामान्य माणसावर आणि माझ्या शेतकरी बापावर आहे. माझी निष्ठा कोणत्या नेत्यांवर-अभिनेत्यावर नाही. माझ्या डोक्यात कोणता नेता नाही. जात, पात, धर्म, पंथ नाही. माझ्या डोक्यात जनता आहे म्हणून मी चार वेळा आमदार निवडून आलो नाही. जनतेचा बाप कोण होऊ शकतो का? बापाप्रमाणे आता कोण आपुलकीने राहतं का? जनता हिच माय बाप असतात. बाप मेल्याचं दुःख नाही, पण नेत्या मेल्याचं दुःख कार्यकर्त्यांना असतं, असे गद्दार महाराष्ट्रात आहेत. बापापेक्षा नेता महत्वाचा वाटत असलेल्या कार्यकर्त्यांमुळे लोकशाहीची आणि देशाची वाट लागली आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.